बीड दि. ५ (प्रतिनिधी) येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रोफेसर डाॅ. रजनी शिखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. उपप्राचार्य डॉ.गणेश मोहिते, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. विजय गुंड, प्रबंधक पी.पी.डावकर, कार्यालय अधीक्षक किसन सागडे यांच्या हस्ते डाॅ. रजनी शिखरे यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी डाॅ. रजनी शिखरे म्हणाल्या की, संस्थेने या नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी केलेली नियुक्ती ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. बलभीम महाविद्यालयाची मी माजी विद्यार्थीनी असल्याने आपल्याच महाविद्यालयाचे प्राचार्यपद सांभाळणे यासारखा आनंद नाही. महाविद्यालयाला गौरवशाली परंपरा असून महाराष्ट्रात नावाजलेले महाविद्यालय म्हणून ओळख आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही परंपरा पुढे घेऊन जायची आहे.
तत्पुर्वी उपप्राचार्य डॉ.गणेश मोहिते यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयातील भौतिक सुविधा, महाविद्यालयात राबवले जाणारे अभ्यासपुरक उपक्रम, नॅकच्या अनुषंगाने महाविद्यालयाची तयारी या बाबींची माहीती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप परदेशी यांनी केले, तर आभार प्रा. विजय गुंड यांनी मानले.
या समारंभास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.