आष्टी:
जामखेड जवळील मोहा या गावी ग्रामीण विकास केंद्र संचलित, निवारा बालगृहास ऍड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालय आष्टी यांच्या वतीने धान्याची भेट देवून अनाथ मुलांना मदतीचा हात दिला. या बालगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनींची उच्च शिक्षणाची सोय हंबर्डे महाविद्यालय करेल असे आश्वासन यावेळी प्राचार्य डॉ. एस आर. निंबोरे यांनी दिले.
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ऍड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालय सातत्याने समाजाभिमुख उपक्रम राबवत असते. दरवर्षी गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना संस्था आणि स्टाफकडून काही मदत करणे हा एक निश्चित उपक्रम आहे. यावर्षी मोहा येथील निवारा बालगृहातील अनाथ विद्यार्थ्यांना गहू, तांदूळ, तेल अशा जीवनावश्यक गोष्टी द्यायचे ठरले. त्याप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे, नॅक समन्वयक डॉ. भगवान वाघमारे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. अभय शिंदे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. सखाराम वांढरे व कृषी विभागाचे प्रा. विजय आगरवाल या टीमने चांगल्या प्रतीचे दोन क्विंटल गहू, एक क्विंटल तांदूळ आणि गोडेतेल डबा घेऊन निवारा बालगृहाला भेट दिली. यावेळी संचालक श्री बापू ओव्हळ, प्रकल्प समन्वयक श्री संतोष चव्हाण यांनी हंबर्डे महाविद्यालय टीमचे स्वागत केले. अध्यक्ष अरुणराव जाधव यांच्या संकल्पनेतुन सुरु झालेले निवारा बालगृह अनाथ मुलांसाठी हक्काचं वसतिगृह झाले आहे. फक्त जामखेड आणि परिसर नाही तर राज्यभरातून या बालगृहात विद्यार्थी विद्यार्थिनी येत असतात. काही अनाथ असतात तर काहींना एकच पालक असतात. दूरच्या नातेवाईकांकडून संमती मिळताच संस्थेचे कर्मचारी विद्यार्थ्यांना वसतिगृहात घेऊन येतात. त्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेऊन निवासाची उत्तम व्यवस्था केली जाते. यावेळी संचालक श्री बापू ओव्हळ म्हणाले की निवारा बालगृहास खूप लोक भेट देतात, मार्गदर्शन करतात, दानधर्म करतात तरीही शिक्षकांची भेट आणि मार्गदर्शन जास्त मोलाचं आहे. हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे यांनी बालगृहातील सोयीसुविधाविषयी समाधान व्यक्त केले. शैक्षणिक प्रगतीचीही काळजी वसतिगृहात केली जाते हे पाहून ध्येयवेड्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संचालकांचे त्यांनी आभार मानले. या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ असे वचन संस्थाअध्यक्ष श्री किशोर हंबर्डे यांच्या वतीने प्रचार्यांनी दिले. प्रकल्प अधिकारी श्री संतोष चव्हाण यांनी संचालन केले, आभार मानले आणि अनुभवकथन केले. हंबर्डे महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना किराणा देत शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांसोबत फोटोसेशन केले.