कोळगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा लोकार्पण सोहळा संपन्न
गेवराई दि.२६ (प्रतिनिधी) – पशुधन जगविणे शेतकऱ्यांसाठी जिकरीचे झाले आहे, दुभत्या जनावरांना मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळाल्यास शेतकऱ्यांना दुध धंद्यात बरकत मिळेल, लम्पी मुळे बंद केलेले आठवडी बाजार आता सुरू केले पाहिजेत त्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सांगितले. कोळगाव येथिल नवीन पशुवैदयकीय दवाखान्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
कोळगाव येथील नूतन पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच राजेंद्र कदम, जयभवानी कारखान्याचे संचालक मदनराव घाडगे, विठ्ठलराव शेळके, माजी सरपंच सुरेश लोंढे, किशोर पारेख, सरपंच संदीपान दातखीळ, माजी सरपंच सोमेश्वर गचांडे, बाजार समिती संचालक संभाजीराव पवळ, आबासाहेब लोंढे, सरपंच विष्णू पिसाळ, वैजिनाथ अनभुले, चेअरमन विकास सानप यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, लम्पी आजारामुळे जनावरांचे बाजार बंद झाले होते, त्यामुळे दुभत्या जनावरांसह शेतकरी अडचणीत आला होता. आता लम्पी आजाराचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, त्यामुळे बंद झालेले जनावरांचे बाजार सुरु केले पाहिजेत. पशुवैद्यकीय दवाखाने सज्ज करुन जनावरांची यापुढेही काळजी घेतली पाहिजे. जनावरांचा बाजार पुन्हा सुरु करण्यासाठी आपण प्रयत्न करु असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला दिमाखवाडीचे सरपंच विजय जाधव, शामराव अलगुडे, प्रल्हाद कराडे, रणधीर काशीद, गटविकास अधिकारी वैभव जाधव, अभियंता नागरगोजे, अभियंता चोपडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.