जुनी पेन्शन योजनेसह इतर मागण्या मान्य न झाल्यास
14 मार्चपासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार — राजकुमार कदम

0
60

जुनी पेन्शन योजनेसह इतर मागण्या मान्य न झाल्यास
14 मार्चपासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार — राजकुमार कदम

मराठवाडा शिक्षक संघाचा गेवराईत भव्य शिक्षक मेळावा

गेवराई ( प्रतिनिधी ) शिक्षकांसह विविध विभागात काम करणारे शासकीय व निमशासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसह आपल्या विविध मागण्या सातत्याने राज्य सरकारकडे करत आहेत. परंतु त्याकडे सत्तेत आलेल्या प्रत्येक राजकीय मंडळीने दुर्लक्ष केले. तमाम कर्मचाऱ्यांच्या भविष्य आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने आता राज्यातल्या सर्व विभागातले कर्मचारी 14 मार्च पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम यांनी राज्य सरकारला दिला आहे.
गेवराई येथील द बा घुमरे विद्यालयात दिनांक 25 फेब्रुवारी रोजी मराठवाडा शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दिनकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भव्य शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यास मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, माजी जिल्हाध्यक्ष डी जी तांदळे, जिल्हा सचिव गणेश आजबे, गेवराई तालुकाध्यक्ष दिनकर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना राजकुमार कदम म्हणाली की, राज्यकर्त्यांनी एक वेळेस निवडून आले तरी स्वतःसाठी पेन्शन मिळून घेतली आहे त्यासोबतच अनेक सुविधाही मंजूर करून घेतले आहे परंतु 25 ते 30 वर्षे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र जुनी पेन्शन योजना नाकारली आहे हा गंभीर प्रश्न आहे आज अनेक राज्यात जुनी पेन्शन योजना लागू असताना, महाराष्ट्रात मात्र जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत निर्णय घेतला जात नाही. यासाठी 14 मार्चपासून राज्यातले सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत ज्या ज्या वेळी कर्मचाऱ्यांनी आंदोलने केली त्या त्यावेळी त्यांचे प्रश्न सुटले आहेत याची जाणीव ठेवून स्वतःचे प्रश्न सोडून घेण्यासाठी सर्व शिक्षक बांधवांनी एकत्रित येऊन लढा देणे गरजेचे आहे आता गेवराई तालुक्याला दिनकर शिंदे यांच्या रूपाने खंबीर शिक्षक नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्यासह आपण या आंदोलनात ताकतीने सहभागी व्हावे असे आवाहन केले. माजी जिल्हाध्यक्ष डी जे तांदळे म्हणाले की, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. त्याप्रमाणे राज्य सरकारची सगळ्या बाजूने कोंडी केल्याशिवाय आपले प्रश्न निकाली निघणार नाहीत आणि ही कोंडी करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता शिक्षक बांधवांनी एकत्र येऊन या लढ्यात उतरण्याची गरज आहे. केंद्रातल्या मोदी सरकारने रातोरात 500 आणि 1000 ची नोट अचानक बंद केली, त्याच पद्धतीने सुरु असलेली जुनी पेन्शन योजनाही रातोरात बंद करण्याचा निर्णय हे सरकार घेऊ शकते, याची जाणीव ठेऊन आजच जागे व्हा असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे म्हणाली की, जुनी पेन्शन योजना लागू तर करायची आहेच, पण आमची सुरू असलेली जुनी पेन्शन योजना केव्हा बंद होईल याची आम्हालाही खात्री नसल्याने आमच्यासारखे हजारो कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहेत. शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक भरती नाही. ज्यांची भरती केली त्यांना पगार नाही. ज्यांना पगार आहे त्यांना पेन्शन नाही, असे अनेक गंभीर प्रश्न आहेत. याकडे आजच आपण लक्ष दिले नाही तर भविष्यात यापेक्षा गंभीर स्थिती शिक्षण क्षेत्राची होईल अशी भीती व्यक्त करून, हे टाळण्यासाठी सर्वांनी मराठवाडा शिक्षक संघाच्या छत्राखाली एकत्रित येऊन ताकतीने लढ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.
दरम्यान नूतन तालुकाध्यक्ष दिनकर शिंदे यांचा सर्व शिक्षक बांधवांनी हृदयसत्कार केला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संतोष कोठेकर यांनी तर आभार प्रदर्शन अनिल गंगणे यांनी केले. यावेळी तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका यांची अभूतपूर्व मोठया संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here