मराठवाडा शिक्षक संघाच्या तालुकास्तरीय मेळाव्यात
गेवराई तालुकाध्यक्षपदी दिनकर शिंदे यांची निवड

0
75

मराठवाडा शिक्षक संघाच्या तालुकास्तरीय मेळाव्यात
गेवराई तालुकाध्यक्षपदी दिनकर शिंदे यांची निवड

गेवराई (प्रतिनिधी ) शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठून शासन दरबारी न्याय मिळवून देणाऱ्या मराठवाडा शिक्षक संघाच्या गेवराई तालुका अध्यक्षपदी दिनकर शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या रूपाने एक धडपडीचा, लढवैय्या शिक्षक नेता गेवराई तालुक्याला आणि मराठवाडा शिक्षक संघाला मिळाला असल्याचे प्रतिपादन विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम आणि जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे यांनी केले आहे.
गेवराई येथील द बा घुमरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या भव्य तालुकास्तरीय शिक्षक मेळाव्यात दिनकर शिंदे यांची मराठवाडा शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम यांची तर जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे माजी जिल्हाध्यक्ष डी जी तांदळे, जिल्हा सचिव गणेश आजबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक करताना नूतन तालुकाध्यक्ष दिनकर शिंदे म्हणाले की, मराठवाडा शिक्षक संघ सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या जुनी पेन्शन योजनेसह विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहे. आंदोलन करून शासन दरबारी मागण्या मान्य करून घेत आहे. यामुळेच कोणताही राजकीय पक्ष आणि वरिष्ठ नेता सोबत नसताना केवळ शिक्षकांच्या बळावर मराठवाडा शिक्षक संघाचा उमेदवार मताधिक्य घेऊन, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. ही शिक्षकांनी दाखवलेली एकीची ताकद होती. यामुळे आपण प्रेरित होऊन मराठवाडा शिक्षक संघात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. या पुढच्या काळात तालुक्यातल्या कोणत्याही शिक्षक, शाळा आणि संस्थेच्या प्रश्नावर आपण सांघिकरित्या काम करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम म्हणाले की, दिनकर शिंदे यांच्यासारख्या शिक्षक नेतृत्वाची गेवराई तालुक्यातील शिक्षकांसह मराठवाडा शिक्षक संघाला गरज होती. पत्रकार आणि प्ररखड वक्ते असल्याने त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे. आज पासून त्यांच्या पाठीशी मराठवाडा शिक्षकाची संपूर्ण ताकद उभा असेल असे म्हटले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षापासून दिनकर शिंदे हे वेगवेगळ्या माध्यमातून समाजाच्या हिताचे आणि सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करत आहेत. मराठवाडा शिक्षक संघाची ताकद मोठी आहे. परंतु गेवराई तालुक्यात लढवय्या नेतृत्वाची आम्हाला गरज होती. दिनकर शिंदे यांच्या माध्यमातून ती आज पूर्ण झाली आहे. आपले प्रश्न सोडून घेण्यासाठी त्यांच्या आणि मराठवाडा शिक्षक संघाच्या सोबत राहून तालुक्यातील शिक्षक बांधवांनी एक जुटीने काम करावे, पूर्ण संघ आपल्या सोबत असेल असा विश्वास व्यक्त केला.
माजी जिल्हाध्यक्ष डीजी तांदळे यांचेही समायोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संतोष कोठेकर यांनी तर अनिल गंगणे यांनी आभार प्रदर्शन केले. या मेळाव्यास गेवराई तालुक्यातील विविध शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षिका यांची अभूतपूर्व मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here