निराधारांच्या न्याय्य हक्कासाठी विजयसिंह पंडितयांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

0
434

बहुसंख्येने उपस्थित रहा – आनंद सरपते

गेवराई, (प्रतिनिधी) राजकीय द्वेष भावनेतून लाचखोरी करत गेवराई तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीने निराधारांची मोठ्या प्रमाणावर फसवणुक केली आहे. समितीच्या लाचखोरी वृत्तीमुळे हजारो पात्र अर्जदार रास्त अनुदानापासून वंचित राहिले आहेत. निराधारांच्या न्याय्य हक्कासाठी विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मंगळवार, दि.५ मार्च रोजी सकाळी १०३०ः वा. गेवराई तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आनंद सरपते यांनी केले आहे.

गेवराई तालुक्यातील निराधारांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गेवराई तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीने राजकीय द्वेष भावनेतून हजारो पात्र लाभार्थ्यांचे अर्ज नामंजुर केले आहेत. शेकडो लाभार्थ्यांकडे अर्जाची पोहोच असतानाही त्यांची नावे मंजुर किंवा नामंजुर यादीमध्ये सापडत नाहीत. ज्यांनी लाच दिली नाही त्या अर्जदारांवर जाणीवपूर्वक अन्याय करण्याचे पाप समितीने केले आहे. यापूर्वी दि.२७ फेब्रुवारी रोजी प्रशासनाला निवेदन देवून या बाबत कार्यवाही करण्याची मागणी केली होती. लाचखोर आणि आर्थिक संगणमतामुळे बरबटलेल्या प्रशासनाने राजकीय दबावापोटी आजवर कार्यवाही केलेली नाही, त्यामुळे लोकशाही मार्गाने गेवराई तहसिल कार्यालयासमोर मंगळवार, दि.५ मार्च रोजी सकाळी १०३०ः वा. बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आनंद सरपते यांनी दिली.

निराधार, अनाथ आणि दिव्यांग यांना चरितार्थ चालविण्यासाठी शासन अनुदानाची नितांत गरज आहे. त्यासाठी त्यांनी परिपूर्ण अर्ज तहसिल कार्यालयात वेळेवर दाखल केले आहेत. मात्र भाजपा धार्जीन्या समितीच्या लाचखोरी वृत्तीमुळे अनेक अर्ज गहाळ केले असून अनेक पात्र लाभार्थ्यांवर अन्याय करत त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, दि.५ मार्च रोजी सकाळी १०३०ः वा. तहसिल कार्यालयासमोर होणाऱ्या धरणे आंदोलनास अन्यायग्रस्त निराधार, अनाथ व दिव्यांगांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आनंद सरपते यांनी केले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, दिपक आतकरे, मुजीब पठाण, शिवाजी डोंगरे, भिमराव प्रधान, धम्मानंद भोले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here