आष्टी प्रतिनिधी
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळुंज केंद्र जामगाव या शाळेने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आष्टीचे गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,जामगाव केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक नंदकिशोर होगाडे यांच्यासह वाळूंजचे सरपंच सुरेश सातपुते,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत सोले, माजी सरपंच विष्णू खाडे,माजी उपसरपंच अशोक राऊत, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गावडे आदी मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती होती.
प्राथमिक शाळा वाळुंज येथील सोळा विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या त्यांच्याच हस्ताक्षरातील कवितांचे पोस्टर तयार करून त्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.हे पोस्टर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना समर्पित केले आहे.शाळेतील सोळा विद्यार्थी बालकवी-कवयित्री यांनी प्रथम आपल्या कविता सादर केल्या.या स्तुत्य उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी वाळुंज शाळेतील सर्व शिक्षकांचे कौतुक केले.प्रमुख वक्ते प्रसिद्ध कवी सय्यद अल्लाउद्दीन यांनी ‘कवितेचा भित्तीफलक’ हा उपक्रम राबवणारी वाळुंज ही महाराष्ट्रातील प्रथम शाळा असावी असे गौरव उद्गार काढत सर्व विद्यार्थ्यांचे,मार्गदर्शक शिक्षकांचे व उपक्रमाचे समन्वयक शाळेचे सहशिक्षक कवी हरीश हातवटे यांचे अभिनंदन केले.मराठी भाषा संवर्धनासाठी वाळुंज सारखी ग्रामीण भागातील शाळा करीत असलेली धडपड ही विशेष उल्लेखनीय बाब असल्याबाबत त्यांनी व्यक्त केले.एक गाव पाण्यासाठी चंद्रावर गेले, भंडारदरा या गाजलेल्या कवितांसह बालकवींच्या औदुंबर या कवितेला नाविन्यपूर्ण चालीत सादर करून कवी सय्यद अल्लाउद्दीन यांनी उपस्थितांची मने जिंकली. आपल्या विनोदी शैलीत अनेक चुटकुले सांगत विद्यार्थ्यांना एक-दीड तास खिळवून ठेवले.शिक्षक अल्ताफ शेख,श्रीमती कविता पवार,माजी सरपंच विष्णू खाडे,मुख्याध्यापक नंदकिशोर होगाडे यांनी मनोगते व्यक्त केली.कवी हरीश हातवटे यांनी श्री.दि.इनामदार यांची ‘ऋण’ ही कविता नाविन्यपूर्ण चालीत सादर करून उपस्थितांना अंतर्मुख केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक सचिन वारंगुळे,नितीन सोनटक्के,गौरी तावरे,मंजूषा बोंद्रे इ.शिक्षकांनी परिश्रम घेतले.बहारदार सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या दिक्षा जाधव व अंकिता खाडे या विद्यार्थिनींनी केले.उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक अरुण खुळपे यांनी मांडले.