गेवराई, (प्रतिनिधी)
तालुक्यातील उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांनी खरीप २०१६ साठी पिक विमा रक्कमेचा हप्ता भरूनही बँकेच्या तांत्रिक चुकीमुळे शेतकऱ्यांना विमा संरक्षणापासून वंचित रहावे लागले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळावी म्हणून माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला. उच्च न्यायालयात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत ७ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देण्याचे आदेश झाले मात्र बँक आणि विमा कंपनी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अमरसिंह पंडित यांनी सर्वोच्च न्यायालयातही ॲड.दिलीप तौर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने बँक आणि विमा कंपनीची याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवले, त्यामुळे उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांच्या पिक विमा नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
गेवराई तालुक्यातील उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांनी खरीप २०१६ साठी ४९ लाख २२ हजार रुपयांचा पिक विमा हप्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेत जमा केला होता. बँक कर्मचाऱ्याच्या चुकीच्या नोंदीमुळे शेतकऱ्यांना त्यावेळी पिक विमा नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याचे संरक्षणानुसार नुकसान भरपाईची रक्कम मिळावी म्हणून माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर प्रयत्न केले. त्यांनी सन २०१८ मध्ये उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका क्र.७३/२०१८ दाखल केली. यामध्ये दि.२४ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयाने अंतिम आदेश पारीत करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेने १५६२ शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदराने पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले. एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीने विमा हप्त्याची रक्कम १० टक्के व्याजदराने विमा हप्त्याची रक्कम बँकेला परतावा करण्याचेही आदेशात नमुद करण्यात आले. मात्र बँक आणि विमा कंपनीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हानीत केले. सर्वोच्च न्यायालयातही जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार देत बँक आणि विमा कंपनीची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांच्या पिक विम्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अमरसिंह पंडित यांच्यावतीने गेवराईचे भुमिपूत्र दिलीप अण्णासाहेब तौर यांनी सर्वोच्च न्यायालयात काम पाहिले.
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या पाठपुराव्यामुळे उमापूर, गायकवाड जळगाव, मालेगाव, बोरगाव, शेकटा, भाटआंतरवाली, बोरीपिंपळगाव सह उमापूर महसुल मंडळातील १५६२ शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. शेतकऱ्यांनी खरीप २०१६ साठी भरलेल्या ४९ लाख २२ हजार रुपयांच्या पिक विमा हप्त्यापोटी मिळणारी विमा रक्कम ७ टक्के व्याजासह स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमापूर शाखेकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अदा करावी लागणार आहे. ही रक्कम सुमारे पाच कोटी रुपयांहून अधिकची असणार आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी आमदार असताना विधान परिषद सभागृहामध्ये केले होते. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही यश येत नसल्यामुळे अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अमरसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. उमापूर व परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.