4 फेब्रुवारीला अंबाजोगाईत पुरस्कार वितरण
गेवराई ( प्रतिनिधी ) गेल्या 25 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात अभ्यासपूर्ण रोखठोक आणि सडेतोड लिखाण करून आपली वेगळी ओळख निर्माण केलेली पत्रकार दिनकर शिंदे यांना अंबाजोगाई येथील मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी दिला जाणारा मानाचा स्व नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दर्पण दिन आणि मूकनायक दिनाचे औचित्य साधून दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
पत्रकार दिनकर शिंदे हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारितक्षेत्रात काम करत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण करून जनजागृतीचे त्यांनी काम केले आहे. रोखठोक आणि सडेतोड लिखाण करून त्यांनी आपला एक वेगळा वाचक तयार केलेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अप्रतिम मीडिया मुंबईच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चौथास्तंभ आदर्श पत्रकारिता पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवार्ड दिल्ली , जिल्हा युवा पुरस्कार नेहरू युवा केंद्र बीड, महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्कार बुलढाणा, मौलाना अब्दुल कलाम आझाद जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार बीड आदींसह विविध पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलेले आहे. कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाहक असलेल्या पत्रकार दिनकर शिंदे यांनी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने काम करत आहेत. नुकतेच डी एस न्यूज हे यूट्यूब चैनल सुरू करून सोशल मीडियामध्येही त्यांनी अल्पवधीत आपली छाप पाडून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागात असूनही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्याचे नाव चर्चेत आणणाऱ्या दिनकर शिंदे यांना मराठी पत्रकार परिषद मुंबई शाखा अंबाजोगाईच्या वतीने दर्पण दिन व मूकनायक दिनाचे औचित्य साधून दिल्या जाणाऱ्या मानाच्या स्व नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दिनकर शिंदे यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्व पत्रकार बांधवांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
या पुरस्काराचे वितरण दूरदर्शनचे प्रतिनिधी अरुण समुद्रे यांच्या हस्ते व आ. नमिताताई मुंदडा यांच्यासह माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न होणार असुन, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके हे असणार आहेत. या प्रसंगी अंबा साखरचे चेअरमन रमेशराव आडसकर, बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी आ.पृथ्वीराज साठे, उद्योजक प्रदीप ठोंबरे, मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे, कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, स्वाराती चे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, पो.नि.विनोद घोळवे, पो. नि.पडवळ, जेष्ठ पत्रकार अमर हबीब, राम कुलकर्णी, ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष एस.बी. सय्यद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक दत्तात्रय अंबेकर, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य कार्यकारणी सदस्य विलास डोळसे, विभागीय संघटक सुभाष चौरे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष प्रशांत लाटकर, कार्याध्यक्ष पुनमचंद परदेशी, सचिव ज्ञानेश मातेकर यांनी दिली आहे.