बीडमध्ये मूकनायक दिन थाटात साजरा
बीड / प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक पाक्षिकातून गुलामगिरी, दुःख आणि शोषणाचे समर्थन बनलेल्या तत्कालीन व्यवस्थेला छेद दिला.एवढेच नाही तर समतावादी- न्यायवादी-स्वातंत्रवादी परिभाषा मूकनायकाच्या माध्यमातून सामान्यांच्या मनात खोलवर रुजविली. त्यामुळेच मूकनायक हे त्याकाळी तळागाळातील उपेक्षितांचा बुलंद आवाज बनले. त्यामुळे मूकनायक मानवमुक्तीच्या लढ्याचा सिद्धांत बनला, सामाजिक क्रांती घडवून आणण्याची ताकद वृत्तपत्रामध्ये असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर- कांबळे यांनी केले.
बीड शहरातील बार्टी केंद्र येथे बुधवार (दि.३१) रोजी बीड पत्रकार संघाकडून मूकनायक दिनाचा १०४ वा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित समुदायास संबोधित करतांना मान्यवर बोलत होते. यावेळी विचार मंचावर जिल्हा माहिती अधिकारी अंजू निमसरकर- कांबळे, बीड बार्टी केंद्राचे राहूल वाघमारे, प्रा.विक्रम धन्वे, वैभव स्वामी, बसपाचे प्रशांत वासनिक आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना मान्यवर म्हणाले की,आज आपली लोकशाही, संविधान धोक्यात असल्याची चर्चा होतांना दिसते. पण लोकशाही आणि संविधान कुणापासून धोक्यात आहे? जर लोक संविधानवादी आणि लोकशाहीवादी असतील तर लोकशाही आणि संविधान धोक्यात असल्याचा प्रश्न निकालात निघतो. त्यामुळे अशी चर्चा करणाऱ्याने प्रथम संविधानवादी आणि लोकशाहीवादी बनावे. घटनाकाराने जे अधिकार सर्वाना दिलेले आहेत ते अधिकार कुठलीच धर्मव्यवस्था माणसाला देत नाही. म्हणून मूकनायकाच्या पहिल्या अंकात विषमताधिष्ठ, जन्माधिष्ठित, श्रेणीबद्ध, जातधर्माची चर्चा घटनाकाराने केली. इथे माणसांवर माणसांनी गुलामी लादलेली आहे. लादलेली गुलामी झुगारुन देता येते. लोकांना गुलामीतून काढण्याची जबाबदारी आजच्या माध्यमव्यवस्थेवर आलेली आहे. पण जे माध्यम गुलामगिरीतले आहे ते आज गोदी माध्यम म्हणून ओळखले जाते.आज मूकनायकाच्या वारसाची समाजाला गरज असल्याचे मतही मान्यवरांनी व्यक्त केले. दरम्यान उल्लेखनिय पत्रकारीतेबद्दल पुरस्कार प्राप्त पत्रकार बाबा देशमाने, संग्राम धन्वे यांचा सत्कार करण्यात आला. या मूकनायक दिन सोहळ्याचे प्रास्ताविक सुनिल डोंगरे, सूत्रसंचलन आत्माराम ओव्हाळ, आभार अनिल जाधव यांनी मानले. हा मूकनायक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बीड पत्रकार संघाचे उत्तम हजारे, रमाकांत गायकवाड, जितेंद्र सिरसट, विनोद शिंदे, प्रतिक कांबळे, नितीन मुजमुले,उत्तम ओव्हाळ यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.