विभक्त पत्नीला नवऱ्याने दिली धमकी
केज :-
न्यायालयातील पोटगीचा दावा मागे घे आणि फारकत दे. अन्यथा तुझ्या अंगावर गाडी घालून जीवे मारून टाकीन. तसेच दुसरी बायको केलेली आहे. अशी धमकी मुलासह विभक्त राहात असलेल्या नर्सला तिच्या नवऱ्याने दिली आहे.
या बाबतची माहिती अशी की, मिनाक्षी हनुमंत दोरके या प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली माळी येथे अधिरीचारिका म्हणून सरकारी नौकरी करीत आहेत. त्यांचे नवरा हनुमंत दोरके यांच्याशी पटत नसल्याने त्या मागील दोन वर्षा पासून केज येथे भवानी माळ परिसरात त्यांचा दोन वर्षांचा मुलगा पार्थ दोरकेसह नवऱ्यापासून विभक्त राहत आहेत. त्यांच्यात पोटगी व कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळी या संबंधी न्यायालयात वाद चालू आहे.
दरम्यान दि. ५ जानेवारी रोजी त्यांचा नवरा हनुमंत दोरके हा त्यांच्या घरी गेला आणि घरात घुसुन त्यांना म्हणाला की, तु कोर्टात केलेली केस मागे घे आणि फारकत दे. त्याला दुसरे लग्न करायचे आहे. तुझी गरज नाही. असे म्हणुन शिवीगाळ केली व लाथाबुक्याने मारहाण केली. जर फारकत दिली नाही तर गाडीने उडवुन जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली. तसेच त्याने तिला प्रज्ञा कूलथे हिच्याशी फोन वरून बोलायला लावले आणि प्रज्ञा कूलथे तिला म्हणाली की, ती मुंबई पोलीस असून तिचे काही होणार नाही. असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.
दि. १० जानेवारी रोजी मिनाक्षी दोरके हिने तक्रारी वरून तिचा नवरा हनुमंत दोरके आणि प्रज्ञा कूलथे या दोघा विरुद्ध गु. र. नं. १३/२०२४ भा. दं. वि. ३२३, ४५२, ५०४, ५०६, ५०७, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.