गेवराई प्रतिनिधी
विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सिरसदेवी ता. गेवराई येथील एका लाॅजवर एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून, सदरील घटना बुधवारी ता. 13 रोजी उघडकीस आली. दरम्यान, पती- पत्नी म्हणून सदरील जोडप्याने लाॅजवर नोंदणी करून मुक्काम केला होता. महिलेचा खून करून, आरोपीने बाहेरून कुलूप लावून अन्य ठिकाणी आत्महत्या केल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले आहे. तलवडा ता. गेवराई येथील पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून, घटनेची माहिती घेऊन तपास सुरू केला आहे.
तलवडा ता. गेवराई पोलीस ठाणे हद्दीतील, विशाखापट्टणम रोडवर सिरसदेवी परिसरात असलेल्या शिवनेरी हाॅटेलच्या एका रूम मध्ये
अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले आहे. हॉटेलचे मॅनेजर किरण काकडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार , सदरील महिला मंगळवार ता. 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नंदकुमार बन्सीधर वांडेकर [ वय वर्ष 42,रा चिंचाला ता वडवणी ] यांच्या सोबत आली होती. वांडेकर हा, दुपारी दीड वाजता मेडिकल वरून गोळ्या घेऊन येतो, असे सांगून रुमला कुलूप लावून निघून गेला. मात्र, तो परत आलाच नाही. म्हणून, मॅनेजरने रूम उघडून पाहिली असता, एक महिला मृत अवस्थेत पडली होती. पोलीसांना तात्काळ माहिती देऊन कळविण्यात आले. तसेच, वांडेकर यांने ही राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली असून, या प्रकरणातील गुढ वाढले आहे. वडवणी येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
घटनास्थळी पोलीस अधिकारी
राजगुरू यांनी भेट दिली आहे. मृतावस्थेत आढळून आलेल्या महिलेचा मृतदेह, बुधवार ता. 13 रोजी रात्री 7 वाजता
उपजिल्हा रुग्णालय,गेवराई येथे पोस्टमार्टेम साठी आणण्यात आला आहे. तलवडा पोलीस अधिकारी व कर्मचारी पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, ती व तो, नात्याने पती-पत्नी नव्हती, अशी चर्चा आहे. त्यामुळे, त्या महिलाचा खून करून, त्याने आत्महत्या केल्याने, प्रकरणाचे गुढ वाढले असून,
या घटनेने बीड जिल्ह्य़ात खळबळ उडाली आहे.