आठ महिन्या पूर्वी केली होती अपहृत अल्पवयीन मुलीने बालविवाह प्रतिबंधक समितीकडे तक्रार
केज :-
केज तालुक्यात इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे तिच्या आजोळातून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे.
या बाबतची माहिती अशी की, बीड तालुक्यातील एक १७ वर्ष १० महिने वय असलेली मुलगी ही केज तालुक्यातील तिच्या आजोळी राहत असून शेजारच्या गावातील महाविद्यायत इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकत आहे. दि. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:०० वा. च्या सुमारास ती अल्पवयीन मुलगी ही गावातील हापशावर पाणी भरण्यासाठी गेली असता तिचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. म्हणून तिच्या आईच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असून गु र नं ६८६/२०२३ भा दं वि ३६३ नुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.
आठ महिन्या पूर्वी अपहृत अल्पवयीन मुलीने केली होती पालका विरुद्ध तक्रार :- अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीने तिचे पालक हे तिचा बालविवाह करतील या भीतीने तिने पालकाच्या विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक केंद्र बीड यांना माहिती कळविली होती.