गेवराई (प्रतिनिधी) मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे या मागणीसाठी आज दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी संभाजीनगर येथे जनआंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात गेवराई विधानसभा मतदारसंघातील तमाम शेतकरी व शेतकरी पुत्रांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे.
मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे आणि त्यासोबतच नाथसागरातून गेवराई विधानसभा मतदारसंघात असलेल्या गोदावरी पात्र आणि कॅनॉलमधून पाणी सोडावे यासाठी सातत्याने लढा देणाऱ्या शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वरील आवाहन केले आहे. यावेळी बोलताना बदामराव पंडित म्हणाले की, मराठवाड्यात सातत्याने पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झालेली असते. अशा स्थितीत पिण्यास पाणी आणि जनावरांना चाराही उपलब्ध होत नाही. यासाठी आपण हजारो शेतकऱ्यांसह पैठण येथील नाथसागराचे दरवाजे उघडण्याचे आंदोलन केले होते. त्या प्रकरणात अनेक गुन्हे आपल्यावर दाखल झाले. कित्येक वर्ष हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. आत्ता कुठे त्याचा निकाल लागला आहे. असे असतानाही मराठवाड्यावर नेहमीच हक्काच्या पाण्याबाबत अन्याय होत आलेला आहे. त्याचा परिणाम गेवराई विधानसभा मतदारसंघासह माजलगाव आणि इतर तालुक्याला भोगावा लागत आहे. आज मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पैठणच्या नाथसागर सोडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांनी विरोध केला आहे. हे योग्य नाही. यावर्षीही मराठवाड्यात गंभीर दुष्काळी स्थिती आहे. कदाचित या पुढच्या काळात अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्याला आपल्या हक्काचे पाणी तात्काळ सोडावे या मागणीसाठी आजी-माजी आमदार, लोकप्रतिनिधी, शेतकरी व शेतकरी पुत्रांसह विविध संस्थांचे पदाधिकारी संभाजीनगर येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळाच्या कार्यालयावर सकाळी 11 वाजता भव्य जनआंदोलन करणार आहेत. या आंदोलनात गेवराई विधानसभा मतदारसंघातील तमाम शेतकरी व शेतकरी पुत्रांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे.
Home Uncategorized मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठीआजच्या जन आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हा — बदामराव पंडित