माहिती , मनोरंजन व शिक्षणाचा खजिना म्हणजे रेडिओ ;
१३ फेब्रुवारी – जागतिक रेडिओ दिवस आणि स्मरण
जागतिक रेडिओ दिन १३ फेब्रुवारी २०१२ पासून साजरा केला जातो . यानिमित्त इटलीमध्ये पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात आला . याचे आयोजन इटालॅडियोज संस्था , अभियांत्रिकी आणि दूरसंचार विभागाच्या वतीने करण्यात आले होते . २०११ मध्ये युनेस्कोच्या ३६ व्या सत्रामध्ये ‘जागतिक रेडिओ दिन’ची घोषणा करण्यात आली . रेडिओचा भारतातला इतिहास तसा जुना आहे . जगदीशचंद्र बोस यांनी एका प्रयोगाचे प्रदर्शन कोलकात्यात १८८४ मध्ये केले होते . पुढे या रेडिओ तंत्राचा वापर सैनिकी व इतर कामांसाठी व्हायला लागला . भारतात रेडिओची सुरुवात १९२३ मध्ये रेडिओ क्लब येथे झाली .
भारतात ‘बीबीसी’च्या धर्तीवर इंग्रज सरकारने ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ची स्थापना केली . १९२७ मध्ये पहिल्यांदा याचे प्रसारण सुरू झाले , तर १९३२ मध्ये बातम्यांचे प्रसारण होऊ लागले . रेडिओचा वापर दुसर्या महायुद्धात बातम्या देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला . सुरुवातीच्या काळात केवळ काही नळ्या व वायरच्या माध्यमांतून हे रेडिओ सेट तयार केले जात असत . पुढे लाकडाच्या कॅबिनेटच्या आकाराचे रेडिओ सेट आले. १९५० नंतर प्लास्टिकचा वापर करून वेगवेगळ्या रंगांचे रेडिओ संच तयार करायला सुरुवात झाली . १९५४ मध्ये लहान रेडिओ संचाचा म्हणजे ट्रान्झिस्टरचा उदय झाला . त्यानंतर मात्र अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे लहान-मोठे रेडिओ तयार होत गेले .
लहान आकाराचे रेडिओ मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे धावते वर्णन ऐकायला वापरले जाऊ लागले . त्यानंतर केवळ हेडफोनच्या आकाराचे रेडिओ आले . चिनी बनावटीचे आयपॉडच्या आकाराचे रेडिओही आले . सध्या मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या रेडिओंमुळे एक नवीनच क्रांती झाली आहे . १९७७ मध्ये भारतात एफएम रेडिओचे तंत्रज्ञान आले व आकाशवाणीची लोकप्रियता पुन्हा वाढू लागली . सध्या आकाशवाणीच्या अनेक रेडिओ स्टेशन्सबरोबरच खासगी रेडिओ वाहिन्याही आपल्या कार्यक्रमाचे प्रसारण करत आहेत .
फादर ऑफ रेडिओ ( जनक ) कोण ? : – जगातला पहिला रोडिओ बनवला मार्कोनी या इटलीच्या शास्त्रज्ञान . १८९५ मध्ये त्यानं रेडिओचा शोध लावला आणि त्याचं पेटंटही मिळवल . मार्कोनीला ‘फादर ऑफ रेडिओ’ असेही म्हणतात . इंग्रजांनी आणि अनेक युरोपीयन देशांनी हे तंत्रज्ञान आपापल्या वसाहतीत नेल . याच माध्यमातून अमेरिका , आफ्रिका , आशिया खंड आणि ऑस्ट्रेलिया असा रेडिओचा प्रसार झाला . त्या काळी हे माध्यम प्रामुख्यान कम्युनिकेशनसाठी वापरल जात होत . विशेषतः युद्धकाळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी , अनेक खेळांच्या कॉमेंट्रीसाठी रेडिओचा वापर होऊ लागला . स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातही ब्रिटिशांनीच रेडिओ आणला . २३ जुलै १९२७ रोजी मुंबई आणि कलकत्ता येथे ऑल इंडिया रेडिओ नावाने दोन केंद्र सुरु झाली . त्यानंतर १९३२ मध्ये भारत सरकारने भारतीय प्रसारण सेवा नावाचा एक विभाग सुरु केला . १९३६ मध्ये त्याच नाव ऑल इंडिया रेडिओ अस ठेवण्यात आल .
स्वातंत्र्यलढ्यात रेडिओची महत्त्वाची भूमिका :
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात रेडिओने महत्त्वाची भूमिका बजावली . १९४२ मध्ये जेव्हा राष्ट्रीय काँग्रेस रेडिओचे प्रसारण सुरु झाले , तेव्हा महात्मा गांधींनी या रेडिओ स्टेशनवरूनच ‘ भारत छोडो ‘ अशी घोषणा दिली . एवढेच नाही तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही ‘तुम मुझे खून दो , मै तुम्हे आझादी दुंगा ’ ही घोषणाही जर्मनीतील रेडिओद्वारेच दिली होती . इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात जागृत करण्यासाठी स्वातंत्र्य योद्ध्यांनी रेडिओवरूनच घोषणा दिल्या . स्वातंत्र्यानंतर १९५७ साली ऑल इंडिया रेडिओचे नाव बदलून आकाशवाणी असे ठेवण्यात आले . हळू हळू आकाशवाणीचे जाळे देशभर पसरू लागले . आज २३ भाषांमध्ये ४१५ रेडिओ स्टेशनसह ऑल इंडिया रेडिओ ही जगातल्या सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण सेवांपैकी एक बनली आहे . २००१ मध्ये भारतात खासगी रेडिओ स्टेशनलाही सुरुवात झाली .
आकाशवाणी हे मनोरंजनाचे व माहितीसाठीचे श्राव्य माध्यम आहे . हे ग्रामीण लोकाचे आवडते माध्यम आहे . ऑल इंडिया रेडिओ (संक्षिप्तपणे ए आय आर ) अथवा आकाशवाणी असे म्हणतात , ही भारताची अधिकृत रेडिओ प्रसारण संस्था आहे व ही प्रसार भारती या संस्थेची उपशाखा आहे . ही भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाशी संबंधित आहे .
आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण संस्थांपैकी एक आहे . याचे मुख्यालय नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवन येथे आहे .
जागतिक रेडिओ दिवस अधिकृत कसा बनला ?
रेडिओ हे संवादाचे , माहिती व ज्ञानाचे प्रभावी आणि सर्वात जुने माध्यम आहे . १३ फेब्रुवारी १९४५ रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले होते . त्यामुळे हा जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो . मात्र याची अधिकृत घोषणा अगदी अलीकडे म्हणजेच २०१३ साली झाली . तेव्हापासून युनेस्कोद्वारे जगभरातील रेडिओ प्रसारक आणि संघटनांच्या मदतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते . संवादाचे माध्यम म्हणून रेडिओच्या भूमिकेवर चर्चा केली जाते .
२०२५ सालची थीम काय ? :- यूनेस्कोद्वारे दरवर्षी रेडिओ दिनाची एक थीम ठरवण्यात येते . त्यानुसार रेडिओचा प्रभावी प्रसार आणि प्रचार केला जातो . २०२५ च्या जागतिक रेडिओ दिनाची थीम ” रेडिओ आणि हवामान बदल ” ही आहे . ही थीम हवामान बदलाबद्दल लोकांना शिक्षित करण्याची , माहिती देण्याची आणि सक्षम करण्याची रेडिओची क्षमता अधोरेखित करते .
सोशल मीडियावर तर माहितीचा धुमाकुळ माजलेला असतो . मात्र रेडिओ किंवा आकाशवाणीकडे लोक अजूनही विश्वासू माध्यम म्हणून पाहतात . त्यामुळेच तंत्रज्ञानाने माहितीचे लाखो प्रवाह आणले तरीही रेडिओचं स्थान कुणीही घेऊ शकत नाही , हेच यातून सिद्ध होत .
रेडिओ कालचा आणि आजचा :- गेल्या जवळपास शंभर एक वर्षात रेडिओने अनेक स्थित्यंतर अनुभवली . त्याच्या स्वरुपात , तंत्रज्ञानात बदल झाले . सादरीकरणाची शैली , कार्यक्रमांच्या संकल्पना बदलल्या . रेडिओची भाषा बदलली . निवेदकांऐवजी आर जे आले . शांत , संयमी भाषेला सुपरफास्ट , इंग्रजी , हिंदी , मराठी संमिश्र भाषा जोडली गेली . मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिकमध्ये फसलेल्या लोकांसाठी योग्य माहिती पुरवण्याचे काम रेडिओ करतो . नव्या युगाचे श्रोते जोडले जात आहेत , तसे रेडिओचे नवे चॅनल्सदेखील निर्माण होत आहेत . मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजासाठी सरकारने कम्युनिटी रेडिओची संकल्पना सुरु केली आहे . याअंतर्गत अनेक विद्यापीठांचे स्वतःचे कम्युनिटी रेडिओ आहेत . भारतात सध्या २५१ कम्युनिटी रेडिओ आहेत .
‘ आकाशवाणी , अमुक अमुक आपल्याला बातम्या देत आहेत ,’ हे सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ चे चिरपरिचित वाक्य असो , की ‘ बहनो और भाईयो ’ ही रेडिओ सिलोनवरील साद असो .
आपल्या आयुष्याचे अविभाज्य अंग बनलेला रेडिओ दिवसाचे १८ ते २० तास आपल्याबरोबर असतो . आता तर भ्रमणध्वनीमुळे तो सदासर्वकाळ कानालाच चिकटलेला असतो. ध्वनी लहरींचे विद्युत लहरींमध्ये रूपांतर करण्याच्या शोधाने संवाद माध्यमांचा पाया घातला . पुराणकथांमध्ये उल्लेख असलेली आकाशवाणी प्रत्यक्षात अवतरली .
विद्युत चुंबकीय लहरी वातावरणातून पुढे जाण्याची शक्यता जेम्स मॅक्सवेलने १८७३ मध्ये प्रथम कागदावर गणिते करून दाखवली . या संकल्पनेवर अनेक शास्त्रज्ञ १७८९ पासून काम करीत होते ; पण १८८६ मध्ये हैन्रीक हर्ट्झने मॅक्सवेलच्या सिद्धांताला दुजोरा देणारे प्रयोग केले . त्याने शोधलेल्या ‘हर्ट्झच्या लहरी’ ( रेडिओ लहरी ) अनेक शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयोगात वापरायला सुरुवात केली आणि ऑगस्ट १८९४ मध्ये ऑलिव्हर लॉज या ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञाने एका व्याख्यानाच्या वेळी हर्ट्झच्या लहरींचे ५० मीटर अंतरावर प्रक्षेपण करून दाखवले . १८९६ मध्ये मार्कोनीने बिनतारी संदेशवहनाचे स्वामित्व हक्क ( पेटंट ) मिळवले आणि या तंत्रज्ञानाचा व्यापारी तत्त्वावर उपयोग सुरू झाला . संगीत आणि आवाजाच्या प्रक्षेपणाचे काही प्रयोग २० व्या शतकाच्या सुरुवातीला झाले , पण रेडिओ तंत्रज्ञानाचा वेगाने विकास झाला तो पहिल्या महायुद्धात , लष्करी उपयोगासाठी ! १९२० पर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विकासामुळे बातम्या, गाणी, भाषणे ऐकवणारा रेडिओ महत्त्वाचे लोकमाध्यम बनला .
कसा चालतो हा रेडिओ ? :- कुठल्याही रेडिओ यंत्रणेचे दोन मुख्य घटक असतात.
१ ) प्रक्षेपक (ट्रान्समीटर ) २ ) ग्राहक ( रीसिव्हर )
प्रक्षेपक एका बाजूने आलेला श्राव्य स्वरूपातील संदेश स्वीकारतो , तो सांकेतिक भाषेत साइन लहरीमध्ये मिसळतो आणि रेडिओ लहरींच्या स्वरूपात बाहेर सोडतो .
ग्राहक आलेल्या रेडिओ लहरी पकडतो , त्यातील साइन लहरींमधील सांकेतिक भाषेतील संदेश उलगडतो आणि ध्वनिवर्धकामार्फत बाहेर सोडतो . प्रक्षेपक आणि ग्राहक हे दोघेही त्यांच्या कामासाठी अँटेना वापरतात.
रेडिओवरील कार्यक्रम ऐकत असताना आपण सुमारे ५३५ ते १७०५ किलोहर्ट्झ वारंवारितेच्या लहरी रेडिओ पकडत असतो , एफ एम रेडिओ स्थानके सुमारे ८८ ते १०८ मेगाहर्ट्झच्या पट्टय़ातील लहरी प्रक्षेपित करतात . टी.व्ही , भ्रमणध्वनी , रेडिओ , पोलीस , उपग्रहाद्वारे होणारे प्रक्षेपण अशा अनेक कारणांकरिता प्रसारित होणाऱ्या रेडिओ लहरी आपल्या आसपास फिरत असतात . प्रत्येक प्रकारच्या लहरीची वारंवारिता वेगळी असल्यामुळे या लहरी एकमेकांच्या आड येत नाहीत .
प्रक्षेपित होणाऱ्या लहरींची वारंवारिता ध्वनी लहरींच्या दर्जानुसार बदलून साइन लहरींना प्रमाणित केले जाते . प्रमाणित केलेल्या लहरी एफ एम , आकाशवाणी , दूरचित्रवाणीचे ध्वनी संदेश , भ्रमणध्वनी याकरिता वापरल्या जातात .
या पद्धती मध्ये तयार झालेल्या लहरींवर स्थायिक ( स्टॅटिक ) विद्युत लहरींचा अत्यल्प परिणाम होतो . रेडिओमध्ये प्रक्षेपक निवेदकाचा आवाज लहरींची रुंदी प्रमाणित करून , त्या साइन लहरी विस्तारकाकडे पाठवतो . विस्तारक संकेताची ( सिग्नल ) ताकद सुमारे ५०००० वॅटपर्यंत वाढवून त्यांना अँटेनामार्फत अवकाशात पाठवतो .
ग्राहक ( रिसिव्हर ) काय करतो ?
यात पुढीलप्रमाणे घटक असतात – १. अँटेना २. टय़ूनर ३. शोधक (डिटेक्टर ) ४. विस्तारक ( ऍम्प्लिफायर ). अँटेना म्हणजे एक धातूची तार / दांडी, जी रेडिओ लहरी पकडते .
टय़ूनर : अँटेनाकडे हजारो प्रकारच्या साइन लहरी येत असतात . टय़ूनर त्यातली हवी ती लहर निवडण्याचे काम करतो . त्याचे कार्य प्रतिध्वनी तत्त्वावर चालते . टय़ूनरने पकडलेल्या लहरीवर असलेले ध्वनी संकेत शोधण्याचे काम शोधक ( डिटेक्टर ) करतो . रेडिओमध्ये याकरिता ‘डायोड’ ( जो फक्त एकाच दिशेने विद्युतप्रवाह वहन करू शकतो ) हे उपकरण वापरतात . शोधकाने शोधलेले संकेत विस्तारक वाढवतो . त्यासाठी ट्रांझिस्टर हे उपकरण वापरले जाते . हे विस्तारित संकेत ध्वनिवर्धकाकडे पाठवले जातात आणि आपण आवाज ऐकू शकतो .
रेडिओ आणि शेतकरी : रेडिओ हे शेतकऱ्यांसाठी संवाद साधण्याचे आणि माहिती मिळवण्याचे एक प्रभावी माध्यम आहे . रेडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान , नवीन कृषी पद्धती , आणि कृषी योजनांबद्दल माहिती मिळते .
‘ बाबू मोशाय , जिंदगी बड़ी होनी चाहिए , लंबी नहीं ‘ हा रेडिओवरील संवाद अथवा ‘ भाईयों और बहनो ‘ ही रेडिओ सिलोन वरील साद तर आठवतच असेल ….. तर या रेडिओ चा उगम , माहिती जाणून आनंद झाला ना !
चंद्रकांत सरस्वती प्रकाश शेळके
तहसीलदार , बीड
.