जालना
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली 24 ऑक्टोबरची डेडलाईन संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. त्याआधीच मनोज जरांगे पाटील आपल्या लढ्याची नवी दिशा निश्चित केली असून 24 तारखेला न्याय न मिळाल्यास 25 ऑक्टोंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. या उपोषणादरम्यान पाणी, औषधे काहीही घेणार नाही. हे कठोर उपोषण असणार, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक नाक्यावर साखळी उपोषण करणार असून हे युद्ध सरकारला पेलणार नाही. असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.
24 तारखेला जर न्याय मिळाला नाही तर 25 तारखेपासून आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत गावात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आल्याचेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तर राज्यभर साखळी उपोषण करणार असून प्रत्येक नाक्यावर उपोषण होईल अशी माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, 28 तारखेपासून आमरण उपोषणाचे रुपातंर हे आमरण उपोषणात करण्यात येईल अशी रणनिती जरांगे पाटलांनी सांगितली आहे. शांततेत सुरू होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही, या विषयाची तुम्ही गांभीर्याने दखल घ्या, आणि 24 तारखेपर्यंत आरक्षण लागू करावे अशी मागणी यावेळी बोलताना त्यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने आरक्षण घेऊनच गावात यायचे नाहीतर गावात यायचे नाही, असा इशारा देतानाच कुणही उग्र आंदोलन करु नये, आमचे त्याला समर्थन नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तरुणांनी आत्महत्या करु नये तुमच्या सर्वांची आम्हाला गरज आहे. आमरण उपोषणात अन्न-पाणी, वैद्यकीय सेवा घेणार नाही, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे. शांततेचे आंदोलनच आपल्या दारात आरक्षण घेऊन येईल, गरिबांना न्याय देण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता ईडब्लूएस चा नवा विषय आणत आहे. मात्र, आता आम्हाला आरक्षणाशिवाय काहीही सांगू नका. आरक्षण मिळाल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे आम्ही जे मागितलेय ते आम्हाला द्या, इतर काहीही सांगू नका. राज्यातील सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, ही आमची मागणी आहे. तेच आम्हाला हवे आहे, त्याशिवाय आम्हाला काहीही नको. इतर काहीही सांगू नका. मराठ्यांशी दगाफटका करू नका, तुम्ही दिलेल्या शब्दांला जागा, आम्हाला आरक्षण हवे आहे, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता आम्ही त्यांना पुरावे दिले आहेत. शिष्टमंडळ पाठवले आहे. तज्ज्ञही पाठवले आहे. त्यांना हवे असलेले सर्व आम्ही पुरवले आहे. त्यांना सर्व पर्याय दिले आहेत. कायद्याचेही पुरावे दिले आहेत. आरक्षण मिळण्याएवढे सबळ पुरावे आता आम्ही दिले आहे. त्यामुळे आता सबबी नको. आम्हाला आता फक्त आरक्षण हवे आहे. आम्हाला आता मलमपट्टी नको,कायमचा उपचार म्हणजे आरक्षण हवे आहे. आता सरकारच्या हातात दोन दिवस आहेत.या दोन दिवसात आम्हाला आरक्षण द्या, आमच्या नादी लागू नका. आम्हाला आरक्षण द्या, आमच्या भावनांशी खेळू नका, अशी विनंती सरकारला करत आहोत. आता आमचे तरुण शांत बसणार नाही. त्यामुळे हा प्रश्न आता मार्गी लावावा. आम्हाला आरक्षण द्या, आम्ही कोणालाही डोक्यावर घेऊ. मात्र, आम्हाला आरक्षण देणार नसाल, तर आम्हीही त्यांना आश्रय देणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
गावागावात साखळी उपोषण
25 तारखेपासून सर्व गावातून प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषण करण्यात येणार आहे. आम्ही ताकदीने साखळी उपोषण करू. त्यानंतर 28 तारखेपासून त्याचं रुपांतर आमरण उपोषणात होईल. सर्कल निहाय तयारी मराठा समाजाने केली आहे. सर्व गावांनी सर्कलच्या ठिकाणी कायमस्वरुपी बसून उपोषण करायचं आहे, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.