भक्तांची इच्छापूर्ती करणारी गेवराई ची रेणुका माता

0
227

आई राजा उदो उदो…….

आश्विन महिना सुरू होताच वेध लागतात नवरात्र उत्सवाचे गेवराई शहरात हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा होतो. गेवराई शहराच्या मध्यभागात असलेले श्री रेणुका देवी मंदिर नवरात्रात भक्तगणांनी फुलून गेलेले असते. गेवराई शहराचे आराध्यदैवत असलेले श्री रेणुका माता मंदिर मोठे विलोभनीय दिसते. देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेले माहूर या देवीचे मूळ रूप स्वरूप आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारी व भक्तांची इच्छापूर्ती करणारी देवी असे भाविकामध्ये स्थान निर्माण करणारी श्री रेणुकादेवी आहे. एक जागृत देवस्थान म्हणून गेवराई व परिसरात हे मंदिर ओळखले जाते.
मंदिराच्या गाभार्‍यात सुंदर असा तांदळा (मुखवटा) आहे.देवीच्या चेहऱ्यावर तेजपुज्य व मनमोहक असे भाव दिसतात. मंदिरात प्रवेश केल्यानंतर मन प्रसन्न होते, प्रफुल्लीत होते. रेणुकामातेचे मूळ स्वरूप 33 कोटी देवांची माता आदी माता आहे म्हणून तिने आपला पुत्र परशुरामास फक्त अर्धमुखातून दर्शन दिले याच कारणामुळे या देवीचे मुख तांदळाचे आहे. देवीचा शेंदूरमय तांदळा हाच ओंकार-स्वरूप कल्याणकारक आहे.
रेणुका देवीची माहिती स्कंद पुराणात सांगितली आहे की, रेणुका देवीचा जन्म हा आरंभाच्या युगात म्हणजे त्यास कृतयुग म्हणतात. या काळात रेणु नावाचा राजा होता. त्या राजाने एक यज्ञ केला त्या यज्ञातून अग्नी नारायणाने प्रसाद म्हणून एक कन्या अर्पण केली. या कन्येचे नाव रेणुका असे ठेवण्यात आले त्या मुलीचे स्वयंवर रचले गेले. या स्वयमवरा मध्ये राजे-महाराजे, ब्राह्मण अनेक प्रकारच्या विद्वानांना आमंत्रित केले. या आमंत्रितामध्ये विद्वान, गुणवान, सर्वज्ञ, अष्टपैलू आशा जमदग्नीशी रेणुकाचे स्वयंवर पार पडले. परंतु हा विवाह जातीवंत राजे इतर लोकांना मान्य झाला नाही कारण मुलगी राजकन्या व मुलगा साधा ब्राह्मण होता. त्यांना अपमान वाटू लागला. पुढे त्यांच्यात युद्ध झाले या घनघोर युद्धात शेवटी जमदग्नीचा विजय झाला. पुढे त्यांना पाच मुले झाली त्यापैकी परशुराम एक. परशुराम अतिशय जिद्दी व धाडसी होता. परशुरामाने वडिलांची आज्ञा घेऊन शिव व श्रीगणेश यांची घोर तपश्चर्या करून शस्त्रे मिळवली. पुढे एके दिवशी रेणुकामातेने परशुरामाला आज्ञा केली कि पृथ्वीवरील सर्व तीर्थ एकाच जागी असलेल्या जागेवर माझी प्राणप्रतिष्ठापना कर. परशुरामाने आईच्या आज्ञेनुसार सिंह पर्वतावरील श्रीक्षेत्र माहूर येथे देवीची स्थापना केली.
रेणुका माता म्हणजे जगात अवतरून साध्वी, सती, पतीव्रता असल्यामुळे तिला त्रिलोकातील देव-दानव गंधर्व व अप्सरा सुद्धा देवीचा जयजयकार करतात. गेवराई येथिल रेणुका गौरी स्वरूपातील राहिली म्हणून ही जगदंबा गौरी स्वरूपी आहे. गौरपुर हे पूर्वीचे नामाभियान आहे. या मंदिरात सभामंडपाच्या बाजूला महादेवाचे सिद्धेश्वर मंदिर आहे. तसेच एक आकर्षक दीपमाळ ही आहे. मंदिरासमोर एक यज्ञ कुंड आहे. अश्विनी शुद्ध नवमीच्या दिवशी विद्वान ब्राह्मणाच्या उपस्थितीत मंत्रोच्चाराने यज्ञाला देण्यात येते. या यज्ञविधीत मंदिरातील सभामंडप भक्त जणांनी फुलून गेलेला असतो. भाविक भक्त आपल्या इच्छा अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी करण्याच्या दृष्टीने श्रद्धापूर्वक या यज्ञकुंडात श्रीफळाच्या स्वरूपाने आहुती देतात.
मंदिरात नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रात नऊ दिवस भाविक उपवास ठेवतात तर काही स्त्रिया ज्यांनी नवस केला आहे त्या नऊ दिवस धरून मंदिरात बसतात. त्यांची व्यवस्था श्री रेणुकादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने केली जाते तसेच या नऊ दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये सकाळी पाच वाजता देवीची पूजा, सहा वाजता आरती, दुपारी भजन प्रवचन व रात्री सात वाजता श्री रेणुका देवीची महाआरती झाल्यानंतर देवीभागवत पुराणाचे वाचन ह.भ.प. श्री प्रशांत महाराज पुराणिक करतात. त्यानंतर भजन कीर्तनाचा कार्यक्रम होतो.
नवरात्र उत्सवामुळे मंदिराचे वातावरण अतिशय मंगलमय झालेले असते. भाविकात उत्साहाचे वातावरण असते. मंदिर व तेथील मुख्य रस्ते तसेच मुख्य द्वाराची विद्युत रोषणाई यात शोभा वाढवतात. याकाळात मंदिर व परिसरात चोख बंदोबस्त असतो.
यज्ञ झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखी सिमोल्लंघनासाठी मंदिरापासून शहरातील मुख्य रस्त्यावरून बीड रोड वरील मैदानात सिमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. त्या ठिकाणी (सोन्याची) आपट्याची लय लूट करून देवीच्या अंगावर टाकून दर्शन घेऊन भाविक परततात. सिमोल्लंघन कार्यक्रमात गेवराई शहर व परिसरातून अनेक लोक पायी तर कोणी वाहनाने एकत्र जमतात. मुलांचा उत्साह खूप असतो, कुणी मुद्दाम वेगवेगळ्या पेहरावात येतात, मुलांना टोप्या घालतात, त्यात उगवलेल्या धान्याचा तुरा शोभून दिसतो. तेथेच एकमेकांना सोने देऊन आपले प्रेमाचे आलिंगन एकमेकांना देतात.
अशाप्रकारे देवीच्या जयघोषात नवरात्र उत्सवाची सांगता होते.
या दिवसांमध्ये उपेक्षित वनस्पतींना महत्त्व येथे तरवड्याची फुले, वेगवेगळ्या पानांची देवीला माळ, घरात गुगळाचा सुहास अशा प्रसन्न वातावरणात एक आगळीक असते. आता नवरात्र उत्सवाला शारदोत्सव म्हणून साजरे करतात. विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तसेच दसरा मैदानावर आता रावण दहनाचा कार्यक्रम होतो. नगरपरिषदेच्या वतीने आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात येते. त्यामुळे भक्तांचा उत्साह द्विगुणित होत आहे. यामुळे भाविकांची गर्दी वाढत आहे. अशा प्रसन्न वातावरणात भक्तजन रेणुकामातेच्या पालखीचे दर्शन घेऊन सोने आपट्याची लूट करून घरी आनंदाने परततात. असा हा गेवराई येथील नवरात्र महोत्सव.

या रेणुका देवी संस्थान चे पुजारी शिवैक्य यशवंत भाऊराव रुकर हे प्रति वर्षाच्या नवरात्र उत्सवात सक्रिय असायचे,प्रत्येक कार्यात त्यांचा उत्साह होता परंतु हा नवरात्र उत्सव त्यांची उणीव भासवणरा आहे. नियतीपुढे कोणाचेही चालत नाही.

  श्री रेणुका देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पण मागील वर्षांपासून सुरू आहे. गेवराई व परिसरातील भक्तांनी या कामात चांगले योगदान पण केले आहे, अजून पुढील कामासाठी देवी भक्तांनी यात आर्थिक स्वरूपात योगदान करण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

आई राजा उदो उदो…….

नवरात्र निमित्त लेखक –

श्री रविंद्र रुकर गेवराई
मो नं 9421340108

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here