भूमि अभिलेख कार्यालयाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा निर्णय ४० वर्षापासून वृद्ध शेतकर्‍याची हेळसांड

0
343

गेवराई प्रतिनिधी

आपल्या शेतीच्या सातबारामध्ये झालेल्या चुकीची अदला बदल दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील धानोरा येथील वृद्ध शेतकरी गेल्या ४० वर्षापासून लढा देत असून येत्या २ महिन्यात प्रकरण निकाली न निघाल्यास शेतकर्‍याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असून जिल्हाधिकार्‍यांना एका निवेदनाद्वारे तसे कळविले आहे . याबाबतचे वृत्त असे की गेवराई तालुक्यातील धानोरा येथीत रहिवासी अंकुशराव माधवराव शिंदे या शेतकऱ्याची धानोरा शिवारात फेर सर्व्हे नं . १३ मधील गट नं . ३६ व गट नं .३६ येथे शेतजमीन आहे . १९८० मध्ये शेती एकत्रीकरण अंतर्गत झालेल्या चुका दुरुस्ती स्तव फेरफार नोंद वहीत घेण्यात आला . मात्र ७/१२ वर क्षेत्राची अदलाबदल झालेली आहे . सदर शेतकऱ्याची गट नं . ३६ व ३८ मध्ये शेतजमीन आहे. गट नं . ३८ मधील जमिनीचे क्षेत्रफळ गट नं . ३६ मध्ये आणि गट नं. ३८ चे जमीनचे क्षेत्रफळ गट नं . ३६ मध्ये टाकण्यात आले आहे . याच नकाशावरील अदलाबदल झालेल्या क्षेत्रफळाच्या दुरुस्तीसाठी सदर शेतकरी गेल्या ४० वर्षापासून उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात खेटे मारून मारून थकून गेलाय . आता तो शेतकरी ७३ वर्षाचा झाला आहे . जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय बीड, संचालक ,भूमी अभिलेख कार्यालय पुणे /मुंबईपर्यंत वेळोवेळी निवेदने – विनंत्या करूनही गिधाडाचं कातडं पांघरलेल्या अधिकार्‍यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पहाण्यास वेळ नाही . प्रत्येक अधिकारी वेळ मारून नेत आहे . प्रत्येक शेतकऱ्याची अडवणूक या कार्यालयात होत आहे . कामे रखडून ठेवली जातात . कार्यालय सकाळी ९. ४५ वाजता सुरु होते . परंतु या कार्यालयातील अधिकारी – कर्मचारी मात्र निवांत ११ वाजेपर्यंत येतात . चौकशी केली असता इकडचा चार्ज तिकडचा चार्ज आहे असे सांगतात . कार्यालयात बीड – जालना येथून ये – जा करतात . त्यामुळे कार्यालयात काम करण्याकडे लक्ष नसते . शेतकरी सकाळी १० वाजल्यापासून कार्यालयाबाहेर बसून असतात . वाट पाहून निघूनही जातात . या कार्यालयाचे उप अधिक्षक ए. बी . पाटील यांनाही वेळोवेळी दुरुस्ती कामासाठी भेटून विनंत्या करून शेतकरी थकला आहे . या कार्यालयात अर्थपूर्ण व्यवहार केल्याशिवाय कुणाचेही काम होत नाही ,अशा तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या आहेत . वेळोवेळी पैसे मागणी करणाऱ्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून यांना बडतर्फ करावे अशी मागणी होत आहे . गेली ४० वर्ष हेलपाटे घालूनही धानोराचे शेतकरी अंकुशराव माधवराव शिंदे यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक व कर्मचार्‍यांच्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिकारी बीड व संचालक भूमी अभिलेख मुंबई यांच्याकडे १२ सप्टेंबर २०२३ रोजी निवेदनाद्वारे केली आहे . निवेदन दिल्यापासून म्हणजे १२ सप्टेंबर २०२३ पासून ३ महिन्याच्या आत अंकुशराव माधवराव शिंदे यांच्या ७ / १२ वर दुरुस्ती न करून दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे . निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्री, कृषिमंत्री आ. लक्ष्मण पवार, विभागीय आयुक्त छ .संभाजीनगर, उपसंचालक ,भूमी अभिलेख कार्यालय संभाजीनगर, जिल्हा अधिक्षक ,भूमी अभिलेख कार्यालय बीड, तहसीलदार गेवराई व उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय गेवराई यांना देण्यात आल्या आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here