प्रतिनिधी। बीड
वडवणी तालुक्यातील उपळी येथील शेतकरी बाबुराव सखाराम दुधाने यांच्या शेतातील लोंबकाळलेल्या तारांच्या घर्षणाने ऊस जळून खाक झाला. याप्रकरणात नुकसान भरपाईपोटी शेतकर्यास 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने रविवारी (दि.24) महावितरण कंपनीला दिले आहेत.
उपळी शिवारात शेतकरी बाबुराव दुधाने यांची वडिलोपार्जित शेत जमीन असून 2 एप्रिल 2022 रोजी वीज तारांच्या घर्षणाने आग लागून ऊस जळून खाक झाला. याबाबत महावितरण कंपनीला माहिती देऊनही कसलीही दखल घेतली नाही. शेतकर्याने महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शेतकर्यांनी अॅड.एस.आर कुंभार, अॅड.व्ही.सी.मिसाळ, अॅड.एन.के.सिरसट यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे ग्राहक तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. शेतकर्याची बाजू ग्राह्य धरून आयोगाने झालेले नुकसान व मानसिक त्रासापोटी शेतकर्यास 1 लाख रूपये भरपाई, तक्रार खर्च 1000 व मानसिक शारीरिक त्रास पोटी 3000 हजार रुपये तीस दिवसात महावितरण कंपनीने शेतकर्यांना द्यावे. मुदतीत न दिल्यास द.सा.द.शे. 8 टक्के व्याज द्यावे, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीधर कुलकर्णी, सदस्या मेघा गरुड, सदस्या अर्पणा दिक्षित यांनी महावितरण कंपनीला दिले आहेत. शेतकर्यांच्यावतीने अॅड.एस.आर कुंभार, अॅड.व्ही.सी.मिसाळ, अॅड.एन.के.सिरसट यांनी बाजू मांडली. त्यांना सहकार्य अक्षय सिरसट यांनी केले.