गेवराई तालुक्यातील एका ही शाळेत मोफत गणवेश पोहचलाच नाही
गेवराई प्रतिनिधी
मोफत शालेय गणवेश वाटपाच्या योजनेत “हात ओले करून” शिक्षण विभागाने 56 लाखाचा मलिदा गडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त केला जात असून, गेवराई जि.बीड च्या गटशिक्षण अधिकारी कार्यालयाचा कारभार म्हणजे ‘वरून किर्तन आतून तमाशा’ असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पहिली ते आठवीपर्यंत च्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे सूत्र कागदावर ठेवून संबंधित ठेकेदाराच्या खात्यावर 56 लाख रू “पेड” केले आहेत. मात्र, एका ही शाळेत गणवेश वाटप झाले नाही. त्यामुळे, संबंधित विभागाचे अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळेत पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दोन गणवेश वाटपाची योजना राबविण्यात येत असून, या योजनेचा पहिला टप्पा पार पडला आहे. गणवेश वाटपाचे नियम ठरलेले आहेत. शिक्षण विभागाने शाळेच्या मुख्याध्यापकाकडे पैसे वर्ग करायचे आहेत. परंतू , गेवराई जि.बीड च्या गटशिक्षण विभागात कार्यरत असलेले, आदर्शवादी गट समन्वयक श्री. प्रवीण काळम पाटील यांना अंधारात ठेवून, शिक्षण विभागाच्या संबंधित शिक्षक- कर्मचाऱ्यांने गटशिक्षण अधिकारी नवनाथ सोनवणे यांच्या मुक संमतीने 328 शाळेच्या मुख्याध्यापकांना तोंडी आदेशित करून कोरे ठराव घेतले आहेत. काही शाळेवर दबाव, धाक धाखवून निरंक ठरावावर सह्या घेतल्या आणि मर्जीतील ठेकेदाराकडून कागदोपत्रीच गणवेश खरेदी केले. 56 लाखातून जवळपास 21 टक्के रक्कम काढून घेऊन गणवेश खरेदी करण्यात आलेली आहे. सप्टेंबर 2023 च्या पहिल्या आठवडय़ात सर्व पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत. मात्र, अद्याप गणवेश शाळेत गेलेले नाहीत. कागदावर गणवेश वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा घाट बापुसाहेब तारूकर नावाच्या शिक्षकाने तयार केला आहे. या आधीचा एक टप्पा पूर्ण झाला असून त्याची चौकशी करण्याची गरज आहे.
सदरील शिक्षकाकडे शाळेसह गटशिक्षण विभागाचे पाच सहा विभाग आहेत. त्यामुळे, अनेक वर्षांपासून चा काळवंडलेला अनुभव गोरगरीब विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपात वापरून 56 लाख रू गडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बापुसाहेब तारूकर याच्याकडे शिक्षण, गणवेश वाटप, आरटीई प्रवेश, पुस्तक वाटप, शिष्यवृती इ. कामांचा व्याप देण्यात आलेला आहे. न थकता ही सगळी कामे एकटे तारूकर करतात. याचे शिक्षकांनाच आश्चर्य वाटते. काही प्रमाणीक शिक्षकांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालयाच्या गणवेश वाटपाच्या चुकीच्या धोरणाला विरोध केला. मात्र, अशा शिक्षकांना गटशिक्षण अधिकारी सोनवणे यांचे नाव पुढे करून, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धाक दाखवून गप्प केले आहे. दरम्यान, गणवेश वाटपाचे उद्दिष्ट सोयीनुसार पूर्ण करून , आलेल्या रक्कमेतली अर्धी रक्कम गटशिक्षण अधिकारी सोनवणे, गट समन्वयक प्रवीण काळम, बापुसाहेब तारूकर यांना लाटायची आहे. अशी चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे. त्यामुळेच, या चांडाळ चौकडीने कागदापत्री सर्व प्रकारचा मेळ बसवून टेंडर साठी मान्यता दिली. दोघांच्या सह्या झाल्या शिवाय मान्यता मिळत नाही. या बाबतीत गुप्तता पाळण्यात आली असून, कुणाचे टेंडर आहे. कुणाला दिले आहे. त्यांची गुणवत्ता काय आहे ? कुणाच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली. या संदर्भात गोपनीयता पाळण्यात आली असून, पैसे वर्ग होऊन ही गेवराई जि.बीड च्या 328 शाळे पैकी एका ही शाळेत एक ही गणवेश वाटप झालेला नाही. त्यामुळे, सगळा आलबेल कारभार उघडकीस आला आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या, शिक्षण विभागाची अतिशय चांगली योजना, गोरगरीब समाजातील वंचित घटकांपर्यंत गेलेली नाही. हे वास्तव लक्षात घेऊन, शिक्षण विभाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी, अशी अपेक्षा शिक्षक, पालकांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात आमदार लक्ष्मण पवार यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. निवडणूक झाली नसल्याने, अनेक ठिकाणी प्रशासक म्हणून काम सुरू आहे. अशा संधीचा गैरफायदा घेतला जात असल्याचे उघड झाले आहे. आदर्शाचा आव आणून, 56 लाख रू गडप करण्याची वृत्ती ठेवणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते. या कडे पालकांचे लक्ष राहणार आहे.