आष्टी प्रतिनिधी
कविता वाचनामुळे आपणाला सुखदुःखाचा परिचय होतो.कथा,कादंबऱ्यातील पात्रांशी आपण एकरूप होतो.त्यातील घटना,प्रसंग, त्यात वावरणारी माणसं ही आपली वाटायला लागतात.कवी,लेखक ते साहित्य,वाचकांच्या स्वाधीन करतो आणि आपण त्यात खोल खोल पर्यंत विहार करतो.त्यातून साहित्य वाचनाचा आनंद तर मिळतोच,शिवाय आपणही त्या कविता,कथा,कादंबऱ्यातील एक पात्र बनून जातो.आपण जेव्हा असं व्हायला नको होतं,तसं व्हायला पाहिजे होतं. याचा विचार करायला लागतो,विचार करताना आपलं मन भवतालच्या सुखदुःखांना आपलंसं करून घेतो.असे उदगार छत्रपती संभाजीनगर येथील एस.बी. आय.बँक शाखा प्रबंधक अनिल वाघ यांनी काढले.आष्टी येथील कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन हे आपल्या कामानिमित्त छ.संभाजीनगर एस.बी.आय.बँकेत गेले असता,त्यांनी आपला झिंदाबाद..मुर्दाबाद कवितासंग्रहाची रौप्यमहोत्सवी तिसरीआवृत्ती,शाखा प्रबंधक अनिल वाघ यांना सप्रेम भेट दिली असता,ते बोलत होते.पुढे ते म्हणाले,बँक शाखा प्रबंधक या नात्याने मी फार भाग्यवान आहे.कारण बँकेतील कामकाजाच्या निमित्ताने कवी,लेखक साहित्यिक या नात्याने माझा अनेक साहित्यिकांशी परिचय झाला.भालचंद्र नेमाडे आणि त्यांचा परिवार,कवीश्रेष्ठ फ.मुं.शिंदे, लेखक,प्रकाशक,कादंबरीकार बाबा भांड असे अनेक साहित्यिक बँकेत आले.त्यांचे येथे येणे म्हणजे,माझ्यासाठी दसरा, दिवाळीच असे मी समजतो.यावेळी कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या काव्य वाचनाच्या छोटेखानी सोहळ्यात अनेक बँक कर्मचारी उपस्थित होते.