मराठा समाजाच्या दाम्पत्याचीराहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

0
158

गेवराई (प्रतिनिधी): राज्यभरात मराठा आरक्षणावरून मराठा समाजात आक्रोश आणि अस्वस्थता पहावयास मिळत आहे. आज जातेगाव येथे ग्रामपंचायतीसमोर मराठा आरक्षणासाठी लाक्षणिक उपोषण सुरू होते. या उपोषणास 38 वर्षीय राजेंद्र चव्हाण हे बसलेले होते. मात्र अचानक उपोषणातून उठले आणि उपोषणस्थळापासून पंधरा फुटाच्या अंतरावर असलेल्या घरी जावून बायकोसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक असे की, जातेगाव येथील राजेंद्र चव्हाण व त्यांच्या पत्नी सोनाली चव्हाण या मराठा समाजाच्या दाम्पत्याने दि. 12 सप्टेंबर वार मंगळवार रोजी स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र सकाळपासून चव्हाण यांच्या घरापासून दहा ते पंधरा फुटावर असलेल्या ग्रामपंचायतीसमोर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लाक्षणिक उपोषण सुरू होतं. या दरम्यान काही मान्यवर आरक्षणाबाबत आणि मराठ्यांच्या आर्थिक स्थितीबाबत भाषण करत होते. या उपोषणाला राजेंद्र चव्हाणही बसलेले होते.मात्र काही काळ उपोषणस्थळी बसून राजेंद्र चव्हाण अचानक घरी गेले. काही वेळानंतर राजेंद्र चव्हाण व त्यांच्या पत्नी सोनाली चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती गावात पसरली. उपोषणकर्त्यांनी तात्काळ उपोषण मागे घेत घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा राजेंद्रचा मृतदेह लटकताना तर सोनालीचा मृतदेह जमीनीवर आढळून आला. दोघांनी आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही. या दोघांचे शव शवविच्छेदनासाठी जातेगाव येथील रुग्णालयात आणण्यात आले आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here