कोणाच्या जीवनात कोण कधी येणार हे सांगता येत नाही.कुटुंबात,समाजात वावरत असतांना एकमेकांना परस्परपूरक आधार मिळणे आवश्यकच.दोन वा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकाच विचाराने प्रेरित होऊन एकजुटीने कार्य करीत असतात.सर्वांचे विचार एकमत घेऊन पुढे गेल्यास निश्चितच बदल होतो.बालपणी आईच्या पदरात असतांना भीती नावाची वस्तू राहत नाही.निस्वार्थ भावनेने काळजी घेणारी माता म्हणजे आई.चालायला,बोलायला,संस्कार देण्यासाठी जीवन व्यतीत करणारे वडील सुद्धा महत्वपूर्ण असते.जन्मदात्यांच्या सानिध्यात असतांना आजी-आजोबा,काका-काकू,मावशी मामा व इतर नात्यांशी मेळ जुळत असतोच.शाळकरी,कॉलेजात शिकत असतांना मित्रांच्या मांदियाळीत मौजमजा चालत असते.कधी तर इतके मित्र-मैत्रिणीमध्ये नाते घट्ट होत जाते की,त्यांच्याविना जगणे असह्य होऊन जाते आणि त्यानंतर वयात आल्यानंतर समाजमान्य विवाह केल्यावर आपली काळजी घेण्यासाठी हक्काचा व्यक्ती मिळत असतो.जीवनात विवाह हा संस्कार असून दोन जीव एकमेळ होऊन संसार चालवीत असतात.असं असतांना सुद्धा मित्र हा खरा मार्गदर्शक,दाता असतो.आपल्या जीवनात घडणाऱ्या बाबींचे यथार्थ वर्णन करण्यासाठी गरजेचा असतो.
मैत्री वा प्रेम एखाद्यावर जाणून केल्या जात नाही. एकमेकांचे विचार समपातळीवर चालत असल्याने एकत्र विचारांची देवाणघेवाण करीत असतात.केवळ बाह्य निरीक्षण करून मैत्रीच्या वा प्रेमाच्या जाळ्यात ओढतांना ओढाताण नक्की होतो.आकर्षणामुळे एखादी व्यक्ती आपल्या मनाला हवी-हवीशी वाटत असते.आपल्या समोर असणाऱ्या व्यक्तीच्या मनाचा आवाका न बघता विचारमंथन करणे म्हणजे एकतर्फी असतो.एकतर्फी प्रेमातून हिंसा,बलात्कार वा हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही.लैंगिक शिक्षणाच्या अज्ञानामुळे वा स्त्रीला दुय्यम स्थान दिल्याने बळजबरी केल्या जाते.मनात असलेली शारीरिक वासना स्वस्थ बसू देत नाही.प्रेम म्हणजे त्यागाचा एक उत्कृष्ठ नमुना आहे.समाजात घडत असलेल्या विघातक घटनेला आळा घालायचा असल्यास संविधानातील ‘स्त्री-पुरुष समानता’ हे मूल्य अंगिकारायला हवेच.तरुणाई सध्या वॉट्सअप्प,फेसबुकच्या युनिव्हर्सिटी मध्ये जास्त व्यस्त असल्याने क्रियाशीलता कमी होत आहे.कामुक भावनेचे व्हिडीओ बघून वासना अधिक निर्माण होते.हिंगणघाट,हाथरस येथील घटना तसेच मणिपूर मधील दोन विवस्त्र महिलेची काढलेली धिंड समाजाला काळिमा फासणारी घटना आहे.आपल्या जीवनात येणारी व्यक्ती त्रास देणारी नको तर याउलट ‘तुम क्या मिले…’ म्हणजे तुम्ही मिळाल्यावर जीवनात आशावादी चित्र निर्माण झाले पाहिजे असे मनोमन वाटायला हवे.
‘तरुणाई’ ही देशाला लाभलेली देणगी आहे.आजचे तरुण उद्याची भावी पिढी आहे.तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली तर राष्ट्राला घातकच आहे.प्रेमात भरकटत आहे.केवळ वासनेच्या आहारी जाऊन जिंदगीची धूळधाण करत आहे.आई-वडिलांच्या स्वप्नाला मूठमाती देत प्रेमामध्ये आंधळे होत आहे.”love is a part of life but not a whole life” असं असतांना सुद्धा प्रेमात पडून आपली जीवनयात्रा संपविण्याच्या घटना घडत आहे.प्रेमात असतांना गैरसमज पसरविणारे आपलेच असतात.गैरसमज निर्माण होऊन दोघांत तेढ आणखी वाढत जाते.प्रेमात असलेल्या व्यक्ती सोबतीने जीवन जगण्याचा अट्टाहास.. त्यानंतर त्यांच्यात येणाऱ्या वितुष्ट,वेदना,विरह असह्य होत असल्याने जीवनाची सांगता करून जोडीने निरोप घेत आहे.या गोष्टी आजच्या तरुणाईला भूषणावह नाही.म्हणून अगोदर शिक्षणाला महत्व देण्यात यावे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ हा संदेश तरुणाईने घ्यायला हवा.’लगेगी नोकरी तो मिलेगी छोकरी’ हा आशावाद मनी बाळगला पाहिजे.
कॉलेजचे दिवस तसे रंगीनच असतात.एकमेकांच्या आवडीनुसार वागणे,आपल्या आवडत्या व्यक्तीच्या शब्दाला प्रमाण मानणे,फिरायला जाणे,सहलीला जाणे,कॅफेत जाणे इत्यादी अनेक गोष्टीचे आकर्षण असते.आवडीने सहवासात राहून मैत्रीचे रोपटे कधी प्रेमाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपते कळतच नाही.प्रेमात इतके गढून जातात की,दुसरं काहीही दिसत नाही.पुढच्या व्यक्तीचा चेहरा नि आठवणी ह्याच मनात साठवून ठेऊन वागत असतात.उठता-बसता त्यांच्याच आठवणी मनात घर करीत असतात.चित्रपत्रात बघितल्याप्रमाणे वास्तवात आपण तसेच जगण्याच्या आणाभाका घेत असतात.तुम्ही जेव्हापासून माझ्या जीवनात आलेत तेव्हापासून जीवन जगण्याचा आनंद गगनात मावेनासा होऊन गेला याची कोमल झुळूक ओठावर स्मित हास्य करवून जाते.प्रेमी युगलांच्या मुखातून मग “तुम क्या मिले जाने जा..प्यार जिंदगी से हो गया..” असे शब्द तरळत राहते.प्रेमी युगल ज्या प्रमाणे तना-मनाने एकत्र आलेले असते त्याचप्रमाणे त्यांच्या वलयाभोवती असलेले नात्यांची वीण घट्ट व्हायला हवी तेव्हाच नात्यातील माणसे देखील तुमच्याकडे बघितल्यावर म्हणायला हवे ना!! की “तुम क्या मिले..सबका दिलं खुले…” एखादा व्यक्ती तुमच्या जीवनात आल्यावर तुमच्यात झालेला बदल,जीवनाशी समरस होण्याची संधी हीच खरी जगण्याची नांदी आहे हे मनात यायला हवे.जेव्हा-जेव्हा आठवणींचे काहूर मनात येतात तेव्हा “तुम जो मिले..तो मन आनंदात डोले” असा खराखुरा भास व्हायला हवा आणि जिंदगी जगण्याची ओढ निर्माण झाली पाहिजे क्योकी तुम जो मिले…
✒️ दुशांत निमकर
मो न 9765548949