गेवराई प्रतिनिधी
मध्यप्रदेश मधील जबलपूर येथे दिनांक २०, २१ आणि २२ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या प्रगतिशील लेखक संघाच्या अठराव्या राष्ट्रीय अधिवेशनात मराठवाड्यातील सात साहित्यिक, लेखकांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रगतिशील लेखक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन म्हणजे देशाच्या सर्व राज्यातील प्रगतिशील साहित्यिक, कलावंतांचा बहुभाषिक मेळावा असतो. प्रगतिशील विचारांची आपल्या साहित्यातून, भूमिकेतून मांडणी करणाऱ्या अशा लेखकांचे हे अठरावे राष्ट्रीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आलेली असून मराठवाड्यातील लेखक, कवींना यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या अधिवेशनात प्रगतिशील लेखक संघाचे डॉ. सुधाकर शेंडगे हे कार्यवाहक म्हणून महाराष्ट्र राज्याचा अहवाल सादर करणार आहेत. डॉ. समाधान इंगळे हे दि. २२ रोजी ‘लेखन विषयक बांधिलकी हीच जीवनाविषयीची बांधिलकी’ या विषयावरील परिसंवादात भाष्य करणार आहे. अधिवेशनातील दि. २१ रोजी प्रा. राहुल कोसंबी “शोषणाविरुद्ध सांस्कृतिक अभिव्यक्ती” या महत्त्वाच्या चर्चासत्रात बोलणार आहेत. कवी वीरा राठोड आणि कवी सुनील उबाळे हे कवी संमेलनात सहभाग नोंदवणार आहेत. तर “जेष्ठ साहित्यिकांसोबत तरुण पिढीचा संवाद” या सत्रात देशभरातील दहा महत्वाच्या साहित्यिक मंडळींसोबत आशा डांगे या सहभागी होणार असून त्यांच्या हिंदीतील अनुवादित “प्रिय, यह कण गॉडपार्टीकल है…” या हिंदी अनुवादित कविता संग्रहाचे प्रकाशन होणार आहे. डॉ .सविता लोंढे या २१ तारखेला होणाऱ्या “आमच्या काळातील प्रकाशाच्या आशा” या सत्राच्या अध्यक्ष मंडळात आपली भूमिका मांडणार आहेत.
या तीन दिवशीय अधिवेशनासाठी संपूर्ण देशभरातून आणि बाहेर देशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील लेखकांचा सहभाग असल्याने हे राष्ट्रीय अधिवेशन साहित्यिक आणि वैचारिक पर्वणी ठरणार आहे.