वाचन साखळी समुह महाराष्ट्र राज्य
पुस्तक क्रमांक – 43
पुस्तकाचे नाव – औषधी वनस्पतींचे उपयोग/ संपादन
संपादक – मा. मीना म्हसे
प्रकाशक – यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे.
पृष्ठे – 80
मूल्य – 100 रु.
मुखपृष्ठ – उत्तम सदाकाळ
समीक्षक – सचिन बेंडभर.
मीना म्हसे यांनी संपादित केलेली औषधी वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांना उपयुक्त
जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका मीना म्हसे यांनी इयत्ता दुसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे औषधी वनस्पतींचे महत्त्व आणि उपयोग हे पुस्तक संपादन केले आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींचे उपयोग, गुणधर्म आणि धार्मिक महत्त्व यांची माहिती अत्यंत सहजगत्या समजते.
केवळ माहिती संकलनच नव्हे तर या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील परस बागेत ही झाडे लावली असून विद्यार्थी त्यांचे उपयोग व महत्त्व सांगतात. याही पलीकडे जाऊन वनस्पतींचे जतन व संवर्धन व्हावे, त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी वाढदिवसाला वृक्ष भेट म्हणून त्यांनी नवीन उपक्रम हाती घेतला. यातून मुलांना झाडाविषयी प्रेम वाटू लागले. आपण लावलेल्या वनस्पतीची माहिती विद्यार्थ्यांनी स्वतः शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच लावलेल्या रोपाला पाणी घालून ते वाढवण्याचे काम ही सर्व मुले मोठ्या आनंदाने करतात.
एवढ्यावरच न थांबता रोपांची वाढ कशी होते, त्यांचे संवर्धन कसे केले जाते हे समजावण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना पिंपळे जगताप येथील तनिष्का हायटेक नर्सरी या ठिकाणी नेऊन रोपांची लागवड, संवर्ध तंत्र व रोपांच्या वाढीची नोंद या बाबी प्रत्यक्ष दाखवल्याने मुलांना त्यात गोडी वाटू लागली.
पर्यावरण जागृती व्हावी यासाठी त्यांनी शाळेत वृक्षदिंडी, वृक्षारोपण आणि झाडांची शाळा यांसारखे अनेक उपक्रम शाळेत राबवली आहेत. विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या औषधी वनस्पतींच्या माहितीचा अभ्यास इतर मुलांनाही करता यावा, यासाठी त्यांनी ही माहिती पुस्तक रुपात आणली आहे. लहान थोरांना सर्वांनाच उपयोगी पडेल अशी महत्वपूर्ण माहिती या पुस्तकात आहे. त्यामुळे हे पुस्तक एकदा तरी आवर्जून वाचावे.
पुणे येथील यशोदीप पब्लिकेशन्सने या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे. पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो. माजी शिक्षण संचालक माननीय श्री. गोविंद नांदेडे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या पुस्तकास लाभली आहे. प्रसिद्ध साहित्यिक व चित्रकार माननीय श्री. उत्तम सदाकाळ यांनी विषयाला अनुरूप काढलेले साजेसे व आकर्षक मुखपृष्ठ पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकतात. संपादक मा. मीना म्हसे यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा..!
सचिन बेंडभर
पिंपळे जगताप, पो- करंदी
ता- शिरूर जि- पुणे 412208.
Mob- 9822999306
Mail- sachinbendbhar3@gmail.com
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/08/IMG-20230820-WA0037.jpg)