गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील प्रकार ; कोर्टाच्या आदेशाने विलास देवकतेवर 420 नुसार गुन्हा दाखल
गेवराई : प्रतिनिधी
खाजगी कंपनीत नोकरीला असलेल्या गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील एका तरुणासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांना रोजगार हमीच्या कामावर मजूर दाखवले. दरम्यान मजुरीची रक्कम फिनो बँकेतील बनावट खात्यावर जमा करुन ती परस्पर हडप देखील केली. हा प्रकार संबंधीत तरुणाच्या लक्षात आल्यानंतर त्याने गेवराई पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र गुन्हा दाखल न केल्याने सदरील तरुणाने कोर्टात धाव घेतली होती. त्यानुसार कोर्टात या प्रकरणातील आरोपी विलास देवकते (रा.रेवकी ता.गेवराई जि.बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर शनिवारी याप्रकरणी कलम 420 सर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणावरुन गेवराई तालुक्यातील रोजगार हमीच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील राजेंद्र रामराव नराडे हा तरुण मागील दहा वर्षापासून चितेगाव ता.पैठण जि.छत्रपती संभाजीनगर याठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास असून तो एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. दरम्यान गेवराई तालुक्यात गतवर्षी रेवकी जिल्हा परिषद गटात रोजगार हमीच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले होते. मयत व्यक्तींना देखील कामावर दाखवून शासनाचा लाखोंचा निधी हडप केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. यामध्ये रेवकी येथील आरोपी विलास देवकते यांनी राजेंद्र नराडे हा नोकरीला असताना देखील हिंगणगाव येथील काही रोजगार हमीच्या कामावर त्याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांना कामावर दाखविले. त्यांचे फिनो बँकेत बनावट बचत खाते खोलून रोजगार हमीच्या कामाची मजूरीची रक्कम त्यामधून हडप देखील केली. हा प्रकार राजेंद्र नराडे या तरुणाच्या लक्षात आल्यानंतर त्याने गेवराई पोलिस ठाण्यात माझ्यावर कुटुंबातील रोहयोच्या कामावर दाखवून आमच्या नावे फिनो बँकेत बनावट खाते खोलून त्यामधून रक्कम उचलली असल्याने आरोपी विलास देवकते याच्यावर गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी केली होती. मात्र गेवराई पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने राजेंद्र नराडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर शुक्रवार दि.19 रोजी आरोपी विलास देवकते याच्यावर गेवराई पोलिस ठाण्यात कलम 420 सह 120 ब, 409, 467, 468, 471 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकारामुळे गेवराईतील रोहयोच्या कामातील अफरातफर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.