सुखलालजी मुथा अमृत महोत्सवा                                       

0
516

जगात अनेक माणसं वावरत असतात. माणसांची गर्दी असते.पण मोजकीच माणसं आपल्या मनावर प्रभाव टाकत असतात.अशा व्यक्तिमत्वाला पाहून आपण भारावून जातो.कधीकधी राहवत नाही म्हणून, त्यांच्या तोंडावर चांगुलपणांचे गुणगाणही गातो.पण अशी माणसं हुरळून जात नाहीत.तुमच्या स्तुती सुमनांचा ते स्वतःवर कुठलाही परिणाम होऊ देत नाहीत.मनातल्या मनात एवढेच म्हणत असतील.अरे च्या,आपली जबाबदारी तर आता अधिकच वाढली म्हणायचं.श्रीमान सुखलालजी पनालालजी मुथा हे एक असेच व्यक्तिमत्व आहे.कुणी लहान असो,थोर असो त्यांच्या सुखदुःखात ते हजर.आनंदातही आनंद,दुःखातही सांत्वनेसाठी दत्त म्हणून उभे.सन 2005 पासून आष्टी जैन श्रावक संघाचे ते संघपती आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने अनेक वर्षापासून मातब्बर विचारवंत,लेखक,समाजसेवक यांच्या बहुमोल मार्गदर्शनाची मेजवानी व्याख्यानाच्या रूपाने आष्टी तालुक्यातील तमाम जनतेला मिळत आली आहे.आता ते वयाची 75 री पूर्ण करतायेत.म्हणजे अमृत महोत्सव.दिनांक 29 जुलै 2023 रोजी त्यांच्या आप्त चाहत्यानी एका समारंभाचे आयोजनही केलेले आहे.त्या निमित्ताने त्यांच्या जीवन प्रवासावर एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न.सुखलालजींना निमित्त लागते,नाहीतर लोकांना,मित्र परिवारांना,  आप्तेष्टांना बोलावून शेतात हुरडा पार्टी देणे त्यांचा छंद असायचा.सुखलालजी मुथा यांचा जन्म आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथे 1948 साली झाला.त्यांना एक भाऊ आणि चार बहिणी.त्यांचे इयत्ता दहावी म्हणजे तेव्हाची मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण लोकमान्य विद्यालय खुंटेफळ येथे झाले.वडिलांचे जेमतेम उदरनिर्वाहाचे साधन.कै.साहेबराव थोरवे दादा सभापती असताना सन 1962 साली त्यांच्या मुळे खरेदी विक्री संघात पनालालजी मुथा यांना नोकरी मिळाली.तेव्हा महिन्याचा 35 रुपये पगार मिळत होता. तिथे खूप कष्ट करायचे.सुखलालजी मुथा यांनी मॅट्रिक नंतर अहमदनगर विद्यालयात पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला.खुंटेफळ गावाला तालुका आष्टी अर्थात जिल्हा बीड आहे. अहमदनगर हे टापूत असल्यामुळे तिथे प्रवेश घेतला.नंतर जीवनात एक वळण आले. माजी आ.साहेबराव दरेकर नाना यांच्याशी घनिष्ठ मैत्री जुळली.नानांचा स्वभाव ही बोलका आणि मनमिळावू.सभापती साहेबराव थोरवे दादा जसे वडिलांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होते,तसेच सुखलालजी मुथा यांच्या पाठीशी माजी आ.साहेबराव दरेकर नाना,दासा दादा धस,रघु शेठ अग्रवाल हे भक्कमपणे उभे राहिले.प्रत्येक गोष्टीत सहकार्य केले.ते म्हणतात या तिघांचे उपकार कधीच विसरू शकत नाही.मैत्री जपली.सन 1967 साली महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून ते भूविकास बँकेत नोकरीला लागले.हिरालाल सारडा,नंदलाल मानधने,यांच्यामुळे बँकेत पाय रोवले गेले.तत्कालीन खासदार केशरबाई क्षीरसागर काकू यांनी मुलासारखे जपले.पुढे श्रीपतरावजी कदम,माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर,भारतभूषण,कांतीशेठ मुथा,जी.एम.पटेल साहेब यांचं बँकेत असताना खूप मार्गदर्शन मिळत गेले.पहिली नियुक्ती माजलगाव या तालुक्याच्या गावी मिळाली.पूर्ण 34 वर्षाच्या सेवा काळात केज,पाटोदा,बीड,आष्टी येथे भूविकास बँकेत सेवा दिली.सन 1967 पासून आष्टीत वास्तव्यात आहेत.सेवानिवृत्ती 2001 साली घेतली.मिळालेल्या अल्पशा पुंजीवर 09 ऑगस्ट 2001 रोजी अडत व्यवसायाला सुरुवात केली.अनेक अडचणी होत्या.आपण व्यवसायात उतरतोय खरं,त्याचं पुढील भवितव्य कसे राहील? याची चिंता त्यांच्या मनाला सतावत होती.डॉ.मधुकर हंबर्डे,ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे यांचा आग्रह होताच. ते म्हणायचे,आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत.त्यांनी मोठं बळ दिलं.विद्यमान आ.बाळासाहेब आजबे काका तेव्हा डायरेक्टर होते.प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर रघुशेठ अग्रवाल यांनी मोलाचं सहकार्य केलं.बबन शेठ मेहेर,पोपटलाल मेहेर,संजय सेठ मेहेर,संतोष शेठ मेहेर,नवनीत शेठ कासवा, नितीन शेठ मेहर,सुनील शेठ मेहेर,नवनीत शेठ कटारिया,विजू शेठ बोगावत,आष्टीतील अशा अनेक व्यापाऱ्यांची फळी भरभक्कमपणे पाठीमागे उभे राहिली.यांनी धैर्य तर दिलेच,शिवाय वेळोवेळी आर्थिक सहकार्य ही केले.चंपालालजी बोरा यांच्या सहकार्याने व्यवसायात वृद्धी झाली.सुखलालजी मुथा यांची राहुल,शेखर,शितल ही तिन्ही मुले जेमतेम शिकलेले असले तरी आज वेगवेगळ्या व्यवसायात ते यशस्वी आहेत.मुलांना कापड व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रारंभी महाराष्ट्रातील प्रसिद्ध मल्ल अली बीन सईद उर्फ आली पैलवान यांनी भर पेठेतली स्वतःची जागा उपलब्ध करून दिली.भूविकास बँकेतल्या नोकरीत इमाने इतबारे सेवा करताना ग्रामीण भागातल्या विविध स्तरातील शेतकरी,शेतमजूर,गरीब,भूमिहीन, अतिगरीब स्तरातील माणसांचे सुखदुःख फार फार जवळून पाहता आले.आर्थिक विवंचना,शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची बेभरवशाच्या पाण्यापावसात काय अगतिकता असते? हे त्यांच्या मनाला बेचैन करी.त्यातून भूविकास या शब्दाला जागून होता होईल तेवढी मदत,अर्थसाह्य देण्याचा मानस सुखलालजी मुथा यांचा असे.त्यातून खूप माणसं जोडता आली.त्यामुळे ती 7पुण्याई अडत व्यवसायात कामी आली.प्रसिद्ध व्यापारी स्व.मनसुखला झुंबरलाल मेहेर,स्व.जय नारायण महाराज,  स्व.विठ्ठल सेठ महाराज,हेमराजजी बोरा यांच्यामुळे आष्टी मध्ये घर घेऊन जीवनाची घडी व्यवस्थित बसवता आली.पुढे रघुशेठ अग्रवाल यांच्यामुळे नवीन बंगला झाला.माजी आ.साहेबराव दरेकर नाना यांची मैत्री व्यवसायात स्थिर होण्यास बळ देणारी ठरली.माजी मंत्री तथा विद्यमान आ.सुरेश आण्णा धस यांनी तर कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी नियुक्ती केली आणि अडत व्यवसायात फार मोठ पाठबळ दिले.तसेच जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी गजानन बँकेवर संचालक पदावर घेतले.सुरेशअण्णां,माजी आ.भीमराव धोंडे साहेब,आ.बाळासाहेब आजबे काका,बलभीमराव सुबरे यांच्याशी आजही स्नेहाचे संबंध आहेत.सुखलालजी मुथा यांचे भाऊ विनोद उर्फ पंडित हे इचलकरंजी येथे उद्योगपती म्हणून ख्याती प्राप्त आहेत.कन्या चंदना गुगळे अहमदनगर येथील अडत व्यावसायिक सुभाषजी गुगळे यांची सून तर हेमंतजी गुगळे,कॉम्प्युटर इंजिनियर यांची पत्नी आहे.शिवाय त्यांचे होलसेल मेडिकल आहे.सुखलालजी मुथा यांची पत्नी सौ.श्रीकवर सुखलालजी मुथा यांनी हालाखीच्या परिस्थितीतही मोलाची साथ दिली.एक सहचारिणी म्हणून त्या धैर्याने पाठीमागे उभे राहिल्या.नेटकाच प्रपंच केला आणि मुलांवर चांगले संस्कार केले. तिन्ही मुलांना परिस्थितीमुळे शिकवता आले नाही,मात्र यांच्या नातवांनी उत्तम गगन भरारी घेतली आहे.यश मुथा या नातवाने आय.आय.टी.करून पवई येथे लठ्ठ पगाराची नोकरी मिळवली आहे.जय मुथा हा नातू अहमदनगर येथे सी.ए.चे शिक्षण घेतो आहे.धनश्री,राशी, हर्ष,शंकेश ही नातव इंग्रजी शिक्षण घेऊन,यश,जय यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत.आज वयाच्या 75 व्या वर्षी मागे वळून पाहताना त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.सुखाच्या,दुःखाच्या अनेक आठवणी जागवल्या.आपल्या वाट्याला जे दुःख आले,ते कुणाच्या वाट्याला येऊ नये.आणि आपल्या वाट्याला आलेले सुखाचे क्षण,सर्वांच्या वाट्याला यावेत.हे त्यांनी व्यक्त केलेले विचार मला सुविचारा इतकेच मोलाचे वाटतात.सुखलालजी पनालालजी मुथा यांना अमृत महोत्सवाच्या लाख लाख

शुभेच्छा!
प्रा.सय्यद अल्लाउद्दीन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here