बीड(प्रतिनिधी):- जिद्द,चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे असे प्रतिपादन देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांनी केले. देवगिरी प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने दि.३० जून रोजी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बीडचे नायब तहसीलदार सुहास हजारे, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक लक्ष्मण बारगजे,प्रा.विनोद रोडे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब मुंडे, प्रा.राम गायकवाड, गुलाबराव भोले, पत्रकार उत्तम हजारे, तुलसी कॉलेज ऑफ आयटीचे प्राचार्य डॉ.लंकेश्वर थोरात, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या प्राचार्य अश्विनी बेद्रे यांची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दि.३० जून रोजी सकाळी ११ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला यावेळी. बोलताना प्रा. प्रदिप रोडे म्हणाले की, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पाठीशी संस्था खंबीरपणे उभी असून ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न संस्थेच्या वतीने करण्यात येईल अशी ग्वाही प्रा.रोडे यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्याच्या या सत्कार सोहळ्यात नोबेल उत्तम हजारे यांना तैवान देशातील एनडीएचयु विद्यापीठाची फेलोशिप घोषित झाल्याबद्दल त्यांना पुढील शिक्षणासाठी देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने पंचवीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यासह स्मृतीचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागातील गोरगरिब,ऊसतोड कामगाराची मुले हालकीची परिस्थिती असताना दहावी बारावी परीक्षेमध्ये उत्कृष्टरित्या कामगिरी करून चांगले मार्क मिळवल्याबद्दल त्यांनाही देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने प्रमाणपत्र, पुस्तक, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने पाच मुलांना दत्तक घेऊन त्यांचा पुढील शिक्षणाचा खर्च संस्था उचलणार असल्याचे प्रा.प्रदीप रोडे यांनी सांगितले आहे. याप्रसंगी कार्यक्रमात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.लंकेश्वर थोरात यांनी तुलसी शैक्षणिक समूहाच्या विविध उपक्रमाविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.किशोर वाघमारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक डॉ.योगिता लांडगे यांनी मानले. यावेळी तुलसी शैक्षणिक समूहातील सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी यांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.