प्रतिनिधी : संजय पंडित
दि.२६ पुणे : धेय्यवेडी माणसंच इतिहास रचतात याचा प्रत्यक्ष प्रत्यय नुकताच पुण्यात अनुभवायला मिळाला.
कर्वेनगर मधील संतोष सुरवसे या नाभिक समाजाच्या सलून व्यवसायिकाने दिनांक २० मार्च रोजी एकाच दिवसात म्हणजे केवळ अठरा तासात तब्बल ५४० जणांचे केस कापण्याचा विक्रम केला आहे.आजवरचे सर्वांचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढीत त्याच्या या सर्वोच्य रेकॉर्डची नोंद आता लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे होणार आहे.
आजपर्यंत इंग्लंड मधील नाभि सलोनी यांच्या नावावर हा रेकॉर्ड होता.त्यांनी ५२६ हेअर कट २० तासात केले होते.भारतात जावेद हबीब यांनी ४११ हेअर कट २४ तासात केले होते.
या सर्वांना मागे टाकीत आता हा विश्व विक्रम संतोष सुरवसे यांच्या नावावर झाला आहे.
संतोष सुरवसे मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवासी पुण्यातील कर्वे नगरमधे गेली पंधरा वर्ष सलून व्यवसाय करीत आहेत.
जिद्द,चिकाटी आणि समाजाच्या सलून व्यवसायाला मान सन्मान मिळावा या उद्देशाने काहीतरी वेगळे करण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीने या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सुरवसे यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमात कर्वेनगर मधील विद्यार्थी,जेष्ठ नागरिक आणि रहिवासी यांच्या उस्फूर्त सहभागाने हा जागतिक विक्रम यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
संतोष सुरवसे यांचा हा विक्रम समस्त नाभिक समाजाचा मान सन्मान वाढवणारा असून सकल सलून व्यवसायाचा स्वाभिमान वाढविणारा आहे.नाभिक समाजातील नव तरुणांना आणि सलून व्यवसायिकांनाही हा रेकॉर्ड प्रेरणादायी ठरत आहे.
म्हणूनच राज्यभरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि समाज कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून राज्यभरातील नाभिक समाज बांधवांकडून कोतुकाची शाबासकी मिळत आहे.
तसेच पुण्यातील विविध संघटना,राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील सुरवसे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत.