नक्षत्रांचे कवडसे

0
82

छापील किंमत – १८०

  • व्यवस्थेवर अचूक भाष्य करणारा वास्तववादी काव्यसंग्रह : नक्षत्रांचे कवडसे*
    कवी नानासाहेब गावडे उर्फ मैत्रेय हे एक संवेदनशील कवी आहेत. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्याल शिक्रापूर येथे अध्यापनाचे काम करत साहित्य क्षेत्रात दमदारपणे पाऊल टाकत त्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यांच्या कविता मनाचा अचूक वेध घेणाऱ्या आहेत. विद्यार्थ्यांना अध्यापनाची काम करत असताना त्यांनाही साहित्याची गोडी लागावी म्हणून शाळेत लेखक, कवी आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत त्यांनी आजपर्यंत अनेक साहित्यिक शाळेत आणले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण या शाखेत उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी अनेक स्पर्धा राबवल्या आहेत.
    या काव्यसंग्रहाची सुरुवात त्यांनी आपल्या स्वर्गीय पत्नीस आपले पहिलेच पुष्प अर्पण करून केली आहे. इतकेच नव्हे तर जीवनातील खडतर प्रवासात ज्यांनी साथ दिली व मार्ग दाखवला अशा आपल्या जिवलग मित्रांचा व नातेवाईकांचा उल्लेख करायला ते विसरले नाहीत. त्यामुळे मनातले विचार व्यक्त करताना ते मनोगत न लिहिता आवर्जून कृतज्ञता लिहितात. जीवनातल्या बारीक-सारीक घडामोडीत ज्यांनी सहकार्य केले त्यांचा ते आवर्जून त्यात उल्लेख करतात. यावरूनच कवीची संवेदनशीलता आपल्या लक्षात येते.
    नक्षत्रांचे कवडसे या काव्यसंग्रहात एकूण 81 कवितांचा समावेश आहे. या काव्यसंग्रहाची सुरुवात शारदा स्तवन या प्रार्थनेच्या कवितेने होते. ज्यांनी शिक्षणापासूनच खडतर परिस्थितीत जीवनाच्या प्रवासाला सुरुवात केली त्या प्रवासाची दाहकता आपल्याला त्यांच्या कवितांतून जाणवते. कवी कल्पनेत न रमता वास्तवाचे भान वाचकाला करून देतो. त्याच्या दुष्काळ या कवितेत कवी म्हणतो,

पाखरांना नाही दाना नाही जनावरांना घास
पाण्याविना होई त्यांचा जीव कासावीस
नाही पाणी नदीला विहिरीन गाठलाय तळ
कुनब्याच्या मागे कारे लागला दुष्काळ

              कवी केवळ जीवनातील समस्या मांडत नाही तर या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी उपायही सुचवतो. अन्यायाविरुद्ध बंड करण्यासाठी आवाज उठवतो. त्यामुळे कवीच्या कविता जगण्याला बळ देण्याचे कार्य करतात. दुःखातून सावरण्याचे मार्ग शोधतात. सकारात्मक विचारांना नवसंजीवनी देण्याचे कार्य या कविता करतात. विशेष म्हणजे या सर्व कविता जशा आहे तशा प्रामाणिकपणे वाचकांपुढे उभ्या राहतात. यात कुठेही शब्दांचा पाल्हाळपणा जाणवत नाही. त्यामधील शब्दांचे सामर्थ्य, त्याची दाहकता आणि वास्तवाचे भान या कविता वाचकांच्या काळजात जागा निर्माण करण्याचे कार्य करतात.

जखम या कवितेतून कवी विरहाचे दुःख मांडताना म्हणतो,

मनावर झालेल्या जखमा
त्या नाय ग येत भरून
त्यांच्या आठवणी होतात
आणि भळभळत राहतात
अश्वत्थाम्याच्या कपाळावरील जखमेसारख्या..!

              कवीच्या कवितेतील विरहाचे दुःख व्यक्त होताना खोलवर झालेल्या जखमा वाचक अंतर्मुख होऊन अनुभवतो. इतका की त्या जखमांचे डागही त्याच्या हातावर उमटतात. इतक्या त्या आपल्या होऊन जातात. कवी आणि कविता कधी एक होऊन जाते ते कळत देखील नाही. दुःखाने खचून गेलेल्या माणसांनी हा काव्यसंग्रह जरूर वाचावा त्याच्या जगण्याला उभारी मिळाल्याशिवाय राहणार नाही.
               कवीने यात शेती, राजकारण, निसर्ग, लेक, स्त्रियांचे जीवन, प्रार्थना, प्रेम आणि विरह या सर्व विषयांचा यात समावेश केला आहे. सर्व विषय वेगवेगळे जरी असले तरी एका माळेत गुंफण्याचे धाडस कवीने यशस्वीरित्या केले आहे. सर्वच कविता वाचनीय आहेत. कवीने भोगलेल्या कष्टातील दुःखातील आणि विरहातील प्रत्येक क्षणाची या साक्ष देतात. काळीज पिळवटून टाकणारा हा काव्यसंग्रह कवीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन जाईल याची निश्चितच खात्री वाटते. 
         महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककवी प्रशांत मोरे यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे. तर पाठ्यपुस्तकातील लेखक डॉ. संजय लोहकरे यांनी या काव्यसंग्रहास अभ्यासपूर्ण अप्रतिम प्रस्तावना दिली आहे. प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी या काव्यसंग्रहाला साजेशे मुखपृष्ठ साकारले आहे. तर प्रकाशक श्री.गिरीश भांडवलकर यांनी या पुस्तकाची उत्तम बांधणी केली आहे. त्याचबरोबर पानांचा दर्जा देखील सुध्दा उच्च ठेवला आहे.

लेखन प्रवासातील जिवलग मित्र, मैत्रेय उर्फ प्रा. नानासाहेब गावडे सरांना पुढील लेखनासाठी खूप सार्‍या शुभेच्छा..!


सचिन बेंडभर
पिंपळे जगताप, पो- करंदी
ता- शिरूर जि- पुणे 412208.
Mob- 9822999306
Mail- sachinbendbhar3@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here