छत्रपती संभाजीनगर
(प्रतिनिधी) भारतीय दूतावास नेपाळ व
अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा यांच्या संयुक्तविद्यमाने काठमांडू येथे नुकतेच नेपाळ – भारत बहुभाषिक साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झाले.
त्यानिमित्ताने मराठी, नेपाळी, मैथिली, अवधी, संस्कृत, हिंदी, भोजपुरी, ऊर्दू, नेपाळी व इंग्रजी अशा १२ भाषेतील तीस कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन काठमांडू येथे संपन्न झाले.
भारतीय दूतावासातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आसावरी बापट, भूपाल राई, नेपाळ येथील कुलपती बिमल कृष्ण श्रेष्ठ, उपकुलपती डॉ. गंगाप्रसाद अकेला या़ंची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी त्रिभुवन विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख डाॅ. संजीता वर्मा तर नेपाळचे राजदूत श्रीवास्तव हे दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शक होते. संमेलनावेळी काशिनाथ न्यौपाने, हिंदी विभाग त्रिभुवन विश्वविद्यालय, गिरीश चंद्रलाल, नेपाळ उच्च न्यायालयाचे पूर्व न्यायाधीश, प्रोफेसर माधव प्रसाद पोखरेल, नेपाळ प्रतिष्ठित भाषातज्ज्ञ आदींची उपस्थिती होती. उपाध्यक्ष म्हणून २४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. ज्योती कदम या उपस्थित होत्या.
संमेलनाचे दीपप्रज्वलन छत्रपती संभाजीनगर येथील कवयित्री आशा खरतडे – डांगे आणि काही निमंत्रित कवी यांच्या हस्ते करण्यात आले.
या संमेलनासाठी महाराष्ट्रातून दहा कवी व कवयित्री यांची निवड करण्यात आली होती. प्रत्येक भाषेतील कवींनी आपल्या दर्जेदार कविता यावेळी सादर केल्या . वेगवेगळ्या बारा भाषेतील साहित्यिकांनी या साहित्य संमेलनात सहभाग नोंदविल्याने इतर भाषेतील विचारांची आदानप्रदान झाली. भारतीय भाषेतील कवितांचा अनुवाद इतर भाषेमध्ये करणारी मंडळी या संमेलनातून पुढे आली. मराठी भाषेतील उत्कृष्ट कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली दिली.
या संमेलनामुळे भारत- नेपाळ मैत्रीचा सांस्कृतिक पूल बांधण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास दोन्ही देशातील साहित्यिकांनी व्यक्त केला. कवयित्री आशा खरतडे – डांगे यांनी त्यांची जत्रा ही कविता मराठी आणि हिंदी भाषेतून सादर केली.
यावेळी त्रिभुवन विश्वविद्यालय, वाल्मिकी विद्यापीठ- नेपाळ, संस्कृत विश्व विद्यालय, अक्षरयात्री प्रतिष्ठान – भारत, स्वामी विवेकानंद संस्था- नेपाळ, राजदूतावास- नेपाळ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नेपाळ येथील राजदुतावासाने आयोजित केलेल्या या बहुभाषिक संमेलनात सहभागी झाल्या बद्दल व. ना. शि. प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य राजाराम राठोड व कार्यकारिणी सदस्यांनी तसेच बळीराम पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शहरातील साहित्य वर्तुळातील मंडळी यांच्या वतीने आशा खरतडे- डांगे यांचे अभिनंदन केले.