तळेगाव येथे तुकाराम बीज सोहळ्याचे आयोजन
बीड (प्रतिनिधी): जगाला शुद्ध भक्तीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे वारकरी संप्रदायाचे कळस म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहेत. बीड पासून जवळच असणाऱ्या तळेगाव काकडहिरा दरम्यान असणाऱ्या जगद्गुरु संत श्री तुकोबाराय सेवापिठामध्ये यावर्षी दिनांक ०२ मार्च २०२३ ते ०९ मार्च २०२३ या कालावधीत तप:पूर्तीबीज सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. संत श्री तुकोबाराय यांनी दिलेले शब्दधन म्हणजे तुकोबांची अमृतवाणी आजही बीजरूपाने उपलब्ध आहे. पुढील पिढीमध्ये त्या शब्दधनाचे बीजारोपण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचे काम या सोहळ्याच्या निमित्ताने होणार आहे. शेतकरी कष्टकरी तसेच सर्व समाजाचा उद्धार करण्यासाठी संतांनी कार्य केले. संत विचारांचा जागर करण्यासाठी मागील बारा वर्षापासून हे काम अविरत चालू आहे. यावर्षी बीज सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे ४ ते रात्री काकडा, विष्णू सहस्त्रनाम, गीतापाठ, गाथा पारायण, नामचिंतन, हरिपाठ, कीर्तन, हरिजागर अशा दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि.२ मार्च रोजी ह.भ.प.माधव महाराज डाके, ३ मार्च रोजी ह.भ.प. विक्रम महाराज सारूक, ४मार्च रोजी नगद नारायण महाराज पुण्यतिथी निमित्त सकाळी ११ ते १ या वेळेत श्रीकृष्ण महाराज उबाळे यांचे तर रात्री सिद्धेश्वर महाराज बागलाने, ५ मार्च रोजी विजय महाराज गवळी, ६ मार्च रोजी योगेश महाराज घोलप, ७ मार्च रोजी गुरुवर्य महंत श्रीरंग महाराज डोंगरे, ८ मार्च रोजी सत्यवान महाराज लाटे इ. कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दि. ९ मार्च रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत जगद्गुरू संतश्री तुकोबाराय सेवापीठाचे संस्थापक तुकोबाराय किंकर ह.भ.प. प्राचार्य परशुराम महाराज मराडे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. या आगळ्यावेगळ्या बीज सोहळ्याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तळेगाव काकडहिरा तसेच जगद्गुरु संत श्री तुकोबाराय सेवापिठाच्या वतीने ह.भ.प.परशुराम महाराज मराडे यांनी केले आहे.