केज : तालुक्यातील मस्साजोग येथील युवा नेतृत्व व माजी सरपंच पती संतोष देशमुख यांचे काही अज्ञाताने दुपारी अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर काही तासानंतर त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून युवा कार्यकर्ता गेल्याने मस्साजोग व तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत माहिती अशी की, संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात असताना डोणगाव जवळ दोन वाहणातून येऊन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून गाडीची तोडफोड करत संतोष देशमुख यांचे अपहरण केले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात आज दुपारी दाखल करण्यात आली होती. मात्र, काही तासानंतर बोरगाव- दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित आहेत. त्यांनी मस्साजोग ग्रामपंचायत ला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमका हा प्रकार कोणी व का केला ? याचा तपास केज पोलीस करत आहेत.