विधानसभेसाठी वंचित चे ; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

0
572

मुंबई :
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र निवडणुकांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वच पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात वंचितने राज्यातील ११ जागांवर उमेदवार दिले आहेत. यात प्रामुख्याने रावेर, नागपूर दक्षिण मध्य, वाशिम, शिंदखेड राजा, शेवगाव, नांदेड दक्षिण या जागांचा समावेश आहे.
रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात
विशेष म्हणजे वंचितने रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात उतरवला आहे. शमिभा पाटील असे वंचितच्या रावेर मतदारसंघातून लढणाऱ्या उमेदवाराचे नाव आहे. शमिभा भानुदास पाटील या एक मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या असून, तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत. त्या 2019 पासून वंचित बहुजन आघाडी सोबत सक्रिय असून काम करत आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करून टाकली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही नावे जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत वंचितने ११ उमेदवारांची घोषणा केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे पहिले उमेदवार
रावेर – शमिभा पाटील
शिंदखेड राजा – सविता मुंढे
वाशिम – मेघा किरण डोंगरे
धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा
नागपूर दक्षिण मध्य – विनय भागणे
साकोली – डॉ. अविनाश नान्हे
नांदेड दक्षिण- फारुख अहमद
लोहा – शिवा नारांगले
औरंगाबाद पूर्व- विकास रावसाहेब दांडगे
शेवगाव – किसन चव्हाण
खानापूर – संग्राम कृष्णा माने

देवेंद्र फडणवीसांविरुद्धही दिला उमेदवार
तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही उमेदवार दिला आहे. नागपूर दक्षिण मध्य या विधानसभा मतदारसंघातून विनय भागणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे नागपूर दक्षिण मध्य विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस विरुद्ध विनय भागणे अशी लढत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here