आष्टी: प्रतिनिधी
हंबर्डे महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी सौ. कोमल भोपळे अस्वर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या सभागृहात वक्तृत्व स्पर्धा उद्घाटन प्रसंगी सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना हंबर्डे महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय यश मिळवण्यासाठी जिद्ध, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न आवश्यक असतात असेही त्या म्हणाल्या.
ॲड. बी. डी. हंबर्डे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 2024 चे उद्धाटन करून प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना संबोधित करताना पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी कोमल भोपळे अस्वर यांनी अनुभवकथन केले. इयत्ता ११ वी ते पदवीपर्यंत हंबर्डे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना घरची बेताची आर्थिक परिस्थिती असूनही पोलीस व्हायचं स्वप्न पाहिले आणि त्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आणि विवाहानंतरही प्रयत्न चालू ठेवले असे त्यांनी सांगीतले. पुणे येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून सेवेत असलेल्या पतीने विशेष साथ आणि प्रेरणा दिल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान निंबोरे यांनी यश मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय सर्व प्रकारचे सहकार्य करते असे सांगीतले. संस्थेचे अध्यक्ष श्री. किशोर हंबर्डे यांनी प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवणाऱ्या व त्यातल्या त्यात पोलिस उपनिरीक्षक पदी निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे सांगीतले. महाविद्यालय इमारतीचे बांधकाम चालू असताना कोमलचे वडील श्री संजय भोपळे यांनी स्वतः काम केले आहे. आज त्यांची कन्या करणारे पीएसआय झाली ह्याचा अभिमान वाटतो असेही ते म्हणाले.
वक्तृत्व स्पर्धेसाठी डॉ. अनिल गर्जे, प्रा. संभाजी झिंजुर्के व डॉ. राजाराम सोनटक्के यांनी परीक्षण केले. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. अक्षता दत्तात्रय वडवणीकर (अहमदनगर होमिओपॅथी कॉलेज अहमदनगर) द्वितीय क्रमांक आकाश वसंत बोडखे (ओंकारनाथ मालपाणी लॉ कॉलेज संगमनेर) व तृतीय क्रमांक गोविंद तुकाराम भांड (बीजेएस महाविद्यालय पुणे) यांनी मिळविला तर उत्तेजनार्थ पारितोषिक कु. काजल तात्यासाहेब राक्षे व कृष्णा शंकर केरुळकर (हंबर्डे महाविद्यालय आष्टी) यांना मिळाले. डॉ. सखाराम वांढरे यांनी प्रास्ताविक, प्रा. सायली हंबर्डे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. अभय शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.