मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र थांबेना
गेवराई | प्रतिनिधी | मराठा आरक्षण
मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांत मराठवाड्यात (Marathwada) होणाऱ्या आत्महत्यांचे (Suicide) सत्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आत्महत्या करू नका असे अवाहन मनोज जरांगे यांच्याकडून सतत करण्यात येत आहे. मात्र, असे असतांना देखील आत्महत्या सुरूच आहे. मराठा आरक्षण आणि अर्थिक नैराश्यातून ३२ वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली,ही घटना गेवराई परिसरातील किनगाव येथे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान घडली. चंद्रकांत लक्ष्मण चाळक (रा. किनगाव , ता. गेवराई, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे सदर व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होते,मुलींच्या शिक्षणाचा आर्थिक भार,घरची हलाखीची परिस्थिती याला कंटाळून नैराश्यातून त्यांनी त्यांचे जीवन संपवले असून त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा पत्नी असा परिवार असून आर्थिक परिस्थीती अत्यंत हालाखीची आहे. चंद्रकांत लक्ष्मण चाळक भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत एकीकडे शेतमालाला भाव नाही , दुसरीकडे मराठा आरक्षण नाही , आणि वाढत चलेली महागाई यामुळे आर्थिक घडी पूर्ण विस्कटलेली तसेच कोणतेच प्रश्न मार्गी लागत नसल्याने आलेल्या नैराश्यातून चंद्रकांत लक्ष्मण चाळक यांनी टोकाचे पाऊल उचलले.