अंबाजोगाई /परमेश्वर गित्ते
आज माणूस जन्म हा प्रत्येकाला नशिबाने मिळत असतो. माणूस जन्म हा सर्वश्रेष्ठ असून हा जन्म मिळाल्यानंतर प्रत्येकाने सत्कर्म करणे अपेक्षित असते. संत सांप्रदाय आणि अध्यात्म आपल्याला हेच शिकवतं. जगातील सर्व नात्यांमध्ये सर्वात विश्वासू आणि मायेचे व प्रेमाचे नाते म्हणून माणूस आई-वडिलांचे आणि मुलांचे नाते आहे. या नात्याला जपण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. प्रत्येकजण आपआपल्या आई-वडिलांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, समाजात असेही काही अभागी आहेत की त्यांना आई-वडिलांच्या पुण्याईने व आशीर्वादाने सर्व काही मिळाले तरी स्वार्थाची हाव सुटत नाही. परंतु यात काही मुले अशी असतात की, ज्यांच्यामुळे आम्ही घडलो आणि ज्यांच्यामुळे आम्ही आहोत त्यांची कृतज्ञता आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्यक्त करण्याचा संकल्प केलेला असतो. अंबाजोगाई शहरातील अर्जुनराव थोरात हे महावितरणमधील सेवानिवृत्त अधिकारी संपूर्ण हयात त्यांनी नोकरीत व शासकीय सेवेत घालविली. हे करत असताना सामाजिक जाणिवा जिवंत ठेवून त्यांनी आपले कर्तव्य अदा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची मुले सचिन थोरात, डॉ. संदीप थोरात व कुलदीप थोरात यांनी आपल्या आई-वडिलांच्या कृतज्ञतेपोटी आई-वडिलांच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस मोठ्यशा उत्साहात आणि थाटामाटात पार पाडला. या सोहळ्याला त्यांचे समकालीन मित्र-मैत्रिणी, वर्गमित्र, नोकरीतील सहकारी मित्र यांना निमंत्रित करून तो आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न केला. मुलांचे हे कौतुक पाहून आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि खर्या अर्थाने आपले जीवन सार्थकी लागल्याची त्यांची भावना बनली.
अंबाजोगाई व धारूर या दोन तालुक्यांच्या पंचक्रोशीत अर्जुनराव थोरात या नावाचे वलय आहे. धारूर तालुक्यातील पांगरी या गावी त्यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या निमित्ताने अंबाजोगाई गाठली. अंबाजोगाई येथे संपूर्ण संस्कार झाले आणि उच्च शिक्षण घेऊन याच ठिकाणी महावितरणमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली. नोकरी करीत असताना सामाजिक भान जिवंत ठेवून अनेकांना मदत व सहकार्य केले. त्या सोबत आपल्या सहकारी कर्मचार्यांची आर्थिक स्थिती भक्कम झाली पाहिजे व त्यांना त्यांच्या अडचणीच्या काळात आर्थिक मदत झाली पाहिजे. या हेतूने जवळपास 40 वर्षांपूर्वी वीज कामगार सहकारी पतसंस्थेची उभारणी केली. आजही ही पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रत्येकाला वेळेवल पैसे देणारी पतसंस्था ठरली आहे. या पतसंस्थेच्या नंतर आलेल्या अनेक पतसंस्था लयास गेल्या आहेत. मात्र, अर्जुनराव थोरात यांच्या नियोजनामुळे आजही ही पतसंस्था नावारूपाला आलेली आहे. त्यांची तीनही मुले चांगल्या ठिकाणी चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. आपल्या मुलांवर चांगले संस्कार रूजवून त्यांना सक्षम बनविण्याचे काम त्यांच्या हातून झाले आहे. तर अर्जुनराव थोरात यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम खर्या अर्थाने त्यांच्या अर्धांगिनी व सहचारिणी सौ. अनिताताई अर्जुनराव थोरात यांनी केले. या दाम्पत्याने मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन समाजामध्ये मानापानाचे स्थान मिळवून दिले. पुढे मुले सुद्धा सुसंस्कारित होऊन त्यांनी आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुखी व आनंदी जीवनाचा मार्ग निवडला. आई-वडिलांनी जे संस्कार केले आणि जीवनामध्ये ज्यांच्यामुळे आपणास नाव व प्रतिष्ठा मिळाली अशा आई-वडिलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सौ. अनिताताई थोरात व अर्जुनराव थोरात यांच्या सहजीवनाच्या 50 व्या वाढदिवसाचे निमित्त साधून लग्नाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्याचा संकल्प केला. त्यानुसार गुरुवार, दि. 9 मे रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यासाठी अर्जुनराव थोरात यांचे सर्व स्नेही मित्र, समकालिन मित्र, वर्गमित्र, नोकरीच्या काळात ज्यांचा ज्यांचा संबंध आला असे सर्व सहकारी, आईच्या सर्व मैत्रिणी, नातेवाईक, स्नेहीजन, आप्तेष्ट व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करून हा सोहळा मोठ्या हर्षोल्हासात आणि तीन पिढ्यांच्या साक्षीने उत्साहात पार पडला. आई-वडिलांची अनोखी कृतज्ञता व्यक्त करणारे त्यांचे सपूत सचिन, डॉ. संदीप व कुलदीप यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. कारण प्रत्येकाला आई-वडिल जन्म देत असतात. परंतु तो जन्म सार्थकी लावणारे आणि त्याची जाणीव ठेवणारे मुले सुद्धा कमी असतात. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. थोरात कुटुंबियांनी अनेकांसमोर हा आदर्श निर्माण केला आहे.