अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न ; गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल
गेवराई तालुक्यातील शेकटा शाळातील घटना
गेवराई, (प्रतिनिधी):- छोट्या जातीच्या मुख्याध्यापकाच्या हाताखाली काम करण्यास सहशिक्षकांना लाज वाटू लागल्याने गेवराई तालुक्यातील शेकटा येथील जि.प.शाळेच्या मुख्याध्यापकास दोन शिक्षकांनी कट रचून अंगावर गाडी घालत,भर रस्त्यावर जबर मारहाण केल्याची घटना दि.१२ मार्च रोजी पाडळसिंगी हायवेवर दुपारी घडली.या घटनेत मुख्याध्यापक अंबादास मल्हारी नारायणकर जखमी झाले आहेत.मुख्याध्यापकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात वार्ड क्रमांक ५ मध्ये उपचार सुरू आहेत.
याबाबत गेवराई पोलिसांनी बुधवारी रात्री सदर मुख्याध्यापकाचा जबाब नोंदविला आहे.याबाबत आरोपींविरुद्ध गेवराई पोलिस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नारायणकर हे गेवराई तालुक्यातील शेकटा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर मुख्याध्यापक आहेत.त्यांच्यासह या शाळेत आठ शिक्षक कार्यरत आहेत.छोट्या जातीच्या मुख्याध्यापकाच्या हाताखाली काम कसे करावे म्हणून मुख्याध्यापक अंबादास नारायणकर यांना सातत्याने सहशिक्षक रघुनाथ नागरगोजे आणि सुभाष संतोष गिरी हे दोघे त्रास देत होते.१२ मार्च रोजी तर या दोघांनी कळसच केला.गाडीमधून प्रवास करताना नागरगोजे आणि गिरी या दोघांनी कट रचून पाडळशिंगी परिसरात मुख्याध्यापक नारायणकर यांच्या अंगावर गाडी घालून भर रस्त्यावर बेदम मारहाण केली.यावेळी सहशिक्षक राजेंद्र घोडके आणि लक्ष्मण परजने यांनी गिरीला रोखले.त्यामुळे मुख्याध्यापक अंबादास नारायणकर यांचा जीव वाचला.त्यांच्या या मारहाणीची शिक्षण विभाग अथवा पोलिसांनी वेळेवर दखल घेतली नाही.शिक्षकांच्या अशा वागण्याने बीड जिल्हा परिषदेची इज्जत वेशीवर टांगली गेली आहे.जखमी मुख्याध्यापकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून बुधवारी रात्री उशिरा गेवराई पोलिसांनी सदर मुख्याध्यापकांचा जबाब नोंदविला आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास पोलिस विभागीय अधिकारी नीरज राजगुरू करीत आहेत.