तंटामुक्त गावात दारूविक्री जोमात

0
336

गेवराई प्रतिनिधी

अवैध दारू विक्रीमुळे तालुक्यातील गावाचे वातावरण दूषित होऊ नये, यासाठी गृह विभागाने आदेश काढून गावागावांत चालणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळून हे अवैध धंदे बंद केले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने या व्यतिरिक्त चांगले उपक्रम देखील राबवून अवैध दारूविक्री बंद केली होती. परंतु, आता पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाली असून अवैध दारूविक्री जोमात सुरू झाली आहे.

तालुक्यातील तंटामुक्त गाव समित्यांनी तालुक्यातील शेकडो अवैध दारूविक्रेत्यांची दुकाने बंद पाडली होती. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा पुरस्कार घेतल्यानंतर आता शासन गावांचे पूनर्मूल्यांकन करीत नसल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या उदासीन झाल्या आहेत. परिणामी, त्यांनी अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष केले. गावातील अवैध दारूमुळे वाढणारे तंटे सोडविणे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला जड जाण्याची स्थिती पुन्हा निर्माण होत आहे.

शासनाला तंटामुक्त समित्यांनी तीन वर्षांनी तंटामुक्त गावांच्या पूनर्मूल्यांकनात पात्र ठरलेल्या गावांना बक्षीस म्हणून पहिल्या वेळी दिलेल्या बक्षिसाच्या रकमेच्या २५ टक्के रक्कम प्रोत्साहित राशी म्हणून देण्याची मागणी केली होती. परंतु, सतत होणाऱ्या या मागणीकडे शासनाने लक्ष न दिल्याने तंटे सोडविण्यात किंवा गावातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी तंटामुक्त गाव समित्या मागे पडल्या आहेत. परिणामी, गावात अवैध दारूविक्रीची दुकाने आता गल्लीबोळांत सुरू होत आहेत. या अवैध दारूविक्रीमुळे गावातील वातावरण दूषित होण्यास सुरुवात होत आहे.

गेवराई तालुक्याला पोलिस मित्रांचा लाभ नाही
गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. मागेच पोलिस विभागाने पोलिस मित्र उपक्रम सुरू केला होता. त्याचा लाभ तंटामुक्त मोहिमेला झाल्याचे दिसत नाही. गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम काम करते.

| गावागावांमध्ये शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यास पोलिसांना मदत करण्यासाठी पोलिस मित्र तयार करण्यात आले होते. गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव समितीला पोलिस मित्र नक्कीच मदत करतील, अशी अपेक्षा होती. दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा उद्देश एकच होता. परंतु, पोलिस मित्र संकल्पना कागदावरच उरल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here