गेवराई :
14 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 02 वाजता वनामती समिती सभागृह नागपूर येथे 2020 खरीप पिकविम्या बाबत कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. आमदार लक्ष्मण पवार, कृषी विभागाचे अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधी यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. 23 जानेवारी 2024 रोजी शासनाने सदर बैठकीचे इतिवृत्त प्रकाशित केले. विमा कंपनीला एक महिन्याच्या आत बीड जिल्ह्यातील गेवराई,बीड व वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांचा 2020 खरीप पिक विमा (नुकसान भरपाई) अदा करण्याबाबत शासनाने सक्त निर्देश दिले आहेत. इतिवृत्ताच्या अनुषंगाने आमदार लक्ष्मण पवार यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले की, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हेच सध्या कृषी मंत्री असल्यामुळे 2020 खरीप पिक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना आमदार लक्ष्मण पवार म्हणाले की 22/08/2022 रोजी विभागीय तक्रार निवारण समितीने दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये विमा कंपनीने राज्य तक्रार निवारण समितीकडे केलेल्या अपिलाच्या अनुषंगाने 28 /11 /2022 रोजी राज्य तक्रार निवारण समितीची बैठक पार पडली. आमदार लक्ष्मण पवार ,आमदार नमिता मुंदडा, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे संबंधित अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. राज्य तक्रार निवारण समितीच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली.राज्य तक्रार निवारण समितीने भारतीय कृषी विमा कंपनीला बीड जिल्ह्यातील गेवराई, बीड व वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना 2020 खरीप पिक विमा (नुकसान भरपाई) 30 दिवसांच्या आत द्यावा असा आदेश दिला.
विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मी स्वतः दोन वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2020 खरीप पिक विमा मिळवून देण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी केली. तसेच विधानसभेमध्ये देखील तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला. कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे देखील वेळोवेळी पत्र व्यवहार करून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली असे आमदार पवार म्हणाले.
लोकांचा हक्काचा पैसा गिळंकृत करून मुग गिळून गप्प बसलेल्या विवा कंपनीला वठणीवर आणण्यासाठी आमदार लक्ष्मण पवार यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून संबंधित अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये आपण स्वतः बैठक घ्यावी अशी मागणी केली. त्या अनुषंगाने 14 /12 /2023 रोजी दुपारी 02 वाजता वनामती समिती सभागृह नागपूर येथे मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदार पवार यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. तर बैठकीला उपस्थित असलेल्या कृषी विभागाक्या अधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांना 2020 खरीप पिक विमा देणे विमा कंपनीला बंधनकारक असल्याचे म्हटले. नामदार धनंजय मुंडे यांनी देखील विमा कंपनीच्या प्रतिनिधींना ठणकावून सांगितले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे कंपनीला बंधनकारक आहे. तसे न केल्यास विमा कंपनीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल.
या बैठकीचे इतिवृत्त प्रकाशित झाल्यानंतर आमदार लक्ष्मण पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आपली वरील प्रतिक्रिया व्यक्त करतानाच शेवटी असे स्पष्ट मत व्यक्त केले. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात बैठकीच्या इतिवृत्तामध्ये विमा कंपनीला एक महिन्याच्या आत नुकसान भरपाई देण्याचे निर्देश शासनाने दिल्यामुळे आमदार लक्ष्मण पवार यांनी राज्याचे कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे यांचे आभार मानले. तसेच एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्रिमहोदयांनी कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.