सत्यशोधक:क्रांतीसाठी त्याग आणि समर्पणाची भावना निर्माण करणारा सिनेमा

0
290

दिनांक पाच जानेवारी रोजी महाराष्ट्रात एकाच वेळी अनेक सिनेमागृहात समता फिल्म निर्मित आणि अभिता फिल्म प्रोडक्शन प्रा.लि.चा सत्यशोधक हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित हा सिनेमा आहे.प्रस्थापित व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी फुले दांपत्याने केलेला त्याग आणि समर्पणाचा लेखाजोखा या सिनेमात आहे. अत्यंत प्रेरणादायी हा सिनेमा आहे.निर्माते, दिग्दर्शाने आणि कलाकारांनी हा सिनेमा तयार करताना खूप मेहनत घेतलेली दिसते. तसे ऐतिहासिक सिनेमा निर्माण करताना या लोकांना खूपच भान ठेवून जबाबदारी पार पाडावी लागते.स्थळ, पात्र, पात्रांची वेशभूषा,घटना, संवाद या तत्कालीन बाबी/गोष्टी प्रेक्षकांसमोर हुबेहूब मांडणे हे काम अत्यंत जिकरीचे असते. परंतु सत्यशोधक सिनेमा हा अत्यंत लिलया पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे. कोणत्याही दृश्यामुळे किंवा संवादामुळे कोठेही समाजात दुही किंवा तेढ निर्माण होणार नाही याची काळजी दिग्दर्शकांनी घेतलेली दिसते. अडीच -पावणे तीन तास प्रेक्षकांना खेळून ठेवणारा आणि प्रेक्षकांमध्ये एक प्रकारची समाजक्रांतीची भावना निर्माण करणारा हा सिनेमा आहे. प्रबोधनाच्या पातळीवर हा सिनेमा खूपच यशस्वी झाला आहे.
सिनेमाचा प्रारंभ आणि शेवट दोन्हीही अत्यंत उद्बबोधक आहेत. सिनेमा सुरू होतो तो महात्मा फुले यांनी छत्रपती शिवरायांची समाधी शोधली या घटनेने! महात्मा फुले बरोबर असणारे त्यांचे सहकारी रायगडावर समाधीचा शोध घेतात, ही घटना पडद्यावर खूपच चांगल्या पद्धतीने साकारली आहे. पात्रांच्या हालचाली आणि पार्श्व संगीत प्रत्यक्ष पडद्यावर पाहण्यासारखे आहे. सिनेमाचा शेवट देखील असाच प्रबोधनात्मक असून महात्मा जोतीराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची निर्मितीची आवश्यकता शेवटी प्रतिपादन करण्यात आली आहे. ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांचा विवाह, एका ख्रिस्ती मिशनऱ्याने ज्योतिराव फुलेंना दिलेले थॉमस पेनकृत राईट ऑफ मॅन, मित्राच्या वरातीत ज्योतिराव फुले यांचा झालेला अपमान, आदि घटना दिग्दर्शकाने अत्यंत खुबीने प्रेक्षकांसमोर मांडल्या आहेत. स्पृश्य अस्पृश्यता, बालविवाह,केश वपन, बालहत्या अशा बाबी समाजामध्ये असल्याने ज्योतिराव फुले यांचे मन हे खट्टू होत होते.या सर्व प्रकारच्या समस्यांचे मूळ हे अज्ञान आहे. अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर निघण्यासाठी गोरगरीब दलित यांचेसाठी शिक्षणाची आवश्यकता ज्योतिराव फुले यांना भासली. अस्पृश्यांना, दीन दलितांना, वंचितांना शिक्षण देणे हे त्यावेळी तेवढे सोपे नव्हते. कारण शिक्षणाचे मुक्तेदारी ठराविक लोकांची होती. म्हणून शाळा काढताना ज्योतिराव फुले यांना झालेला त्रास हा विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने दिग्दर्शकाने हाताळला आहे. सावित्रीबाई फुले यांना ज्योतीरावांनी शिक्षण दिले. तेच शिक्षणाचे ज्ञान सावित्रीबाई फुले शाळेत मुली आणि स्त्रियांना देत असत, शिक्षिका म्हणून जाताना आणि अध्यापन करताना दिलेला त्रास सर्व विधीत असला तरी हा भाग चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडला आहे. सावित्रीबाई फुले यांची एक स्वतंत्र प्रतिभा असणारी स्त्री, स्त्रियांना दास्यातून मुक्तता करणारी समाज क्रांतिकारक म्हणून दिग्दर्शकांनी उभे केलेली सावित्रीबाई खूपच आदर्शवत वाटते. मध्यंतरी शेख उस्मानाने ज्योतिरावांना शिक्षणासाठी दिलेली प्रेरणा तसेच उस्मान शेखची बहीण शेख फातिमा ही सावित्रीबाईंना सहकारी म्हणून लाभली. शाळेमध्ये मुलं आणि मुली याव्यात त्यांनी शिकावं यासाठी लहुजी साळवे या वस्तादाने केलेली शौर्याची आणि धाडसाचीअतुलनीय कामगिरी पडद्यावर पहाच, हे या सिनेमातील एक आकर्षण आहे. ज्योतीराव फुलेंना शिक्षण केवळ पारंपारिक किंवा व्यवहारी नको होते. घेतलेल्या शिक्षणातून माणुसकी निर्माण व्हावी, बंधुता निर्माण व्हावी, स्वतंत्र आणि न्याय नागरिक तयार व्हावा असे त्यांना वाटत होते. मात्र हे करताना समाजात तेढ निर्माण होते म्हणून गोवंडे आदींनी फुलेंना विरोध केला. काहीही करा परंतु गोरगरिबांची मुले शिकवा, ब्राह्मण शहेच्या जो खडा तो त्यांना मुक्त करा असे ज्योतिराव फुले यांचे म्हणणे होते.
त्याकाळी ब्राह्मण शाहीचे वर्चस्व होते. ब्राह्मणशाहीने मांडलेला उच्छाद आणि मनमानी कारभार कसा होता हे प्रत्यक्ष पडद्यावर पाहता येईल. ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा,ब्राह्मणाचे कसब , गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड ,अखंड इत्यादी रचना करून आपल्या अथांग ज्ञाना ची ओळख समाजाला दिली, ही बाब देखील प्रभावीपणे मांडलेली आहे. शैक्षणिक कार्य करत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक शाळा काढल्या. त्या शाळा मधून वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या. मुलांना बक्षीस दिली जायची. अशाच एका निबंध स्पर्धेमधून मुक्ता साळवे नामक सातवीच्या विद्यार्थिनीने निबंध लिहिला. तो निबंध खूपच अभ्यासपूर्ण ठरला. सदर निबंधाचा आशय समजून घ्यायचा असेल तर सिनेमा पडद्यावर पहावा लागेल.शैक्षणिक कार्याबद्दल फुले दांपत्याचा सत्कार ब्रिटिश सरकारच्या वतीने तत्कालीन जिल्हाधिकारी लिजंट यांनी केला. त्या सत्काराला महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेले उत्तर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि दूरदृष्टीचे होते. शेतकऱ्यांबद्दल सुद्धा त्यांच्या मनात खूप तळमळ होती. शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये,त्यांच्यावर कर लादले जाऊ नयेत, त्यांची मुली शिकली पाहिजेत अशी सतत ते भूमिका मांडत होते. शेतकऱ्यांनी सुद्धा शेती करण्याच्या संदर्भातल्या अंधश्रद्धा दूर केल्या पाहिजेत हा देखीलविषय या सिनेमांमध्ये मांडण्यात आलेला आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. या समाजाची घटना आणि नियम त्यांनी तयार केले.नारायणराव लोखंडे यांनी मुंबईत सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली. कामगारांच्या कल्याणासाठी संघर्ष करत असतानाच सत्यशोधक समाजाचे काम देखील नारायणराव लोखंडे यांनी सुरु केले. सत्यशोधक समाजाच्या वतीने समाजातील वाईट रूढी, प्रथा, परंपरा बंद करण्यात आल्या, माणूस आणि ईश्वर यांच्या मधला मध्यस्थ म्हणजे ब्राह्मण या वर्गाला फाटा देण्यात आला. सत्यशोधक समाज याच्या वतीने विवाह होत होते. त्यामुळे ब्राह्मण वर्गाची मोठीच अडचण झाली. ओतुर येथे असाच एक सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला. ग्रामजोशी न बोलवल्यामुळे त्याला दक्षिणा देण्याचा प्रश्नच नव्हता. ग्रामजोशाने दक्षिणा मिळाली नाही म्हणून तो खटला कोर्टात चालवला. दक्षिणा देणे बंधनकारक नाही अशी बाजू मांडणारे वकील म्हणून ज्योतिराव फुलेनी काम केले.विचाराची सखोलता, तडफ पडद्यावरच पाहिली पाहिजे. महात्मा फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा उचित गौरव व्हावा म्हणून त्या वेळचे मुंबई येथील मोठे कामगार नेते नारायण लोखंडे यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्रातील कोणाकोपऱ्यातील समाज सुधारक विचारवंत यांच्या उपस्थितीत मुंबईतील कोळीवाड्यात ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली. या सत्काराला उत्तर देताना महात्मा फुले यांचे समाजक्रांतीचे थोर विचार हे पडद्यावरच पाहिले पाहिजेत. ज्योतिराव फुले हे मोठे बिल्डर होते. हा परिचय बऱ्याच लोकांना नाही .खडकवासला धरणाचे ते कंत्राटदार होते. हे धरण उत्कृष्ट व्हावे यासाठी त्यांनी केलेले विचार आणि कार्य हे खूप दूरदृष्टीचे होते. भाजीपाला विक्रीचे तसेच सोन्याच्या दागिना घडवणाऱ्या वेगवेगळ्या कलात्मक साच्याचे ते कंत्राटदार होते. सिनेमाच्या उपांत्य दृश्यात ज्योतिरावांना अर्धांगवायचा झटका येतो.त्यांचा उजवा हात आणि उजवे सगळे शरीर बधीर होते.’आता मला लिहिता येणार नाही , बोलत आहे स्पष्टपणे येणार नाही, माझ्या सत्यशोधक चळवळीचे काय? हे शल्य त्यांना बोचते. हा एक हृदय द्रावक प्रसंग या सिनेमा मधला आहे.अशा अनेक ठिकाणी काळजाचा ठाव घेणाऱ्या घटनांचे चित्रीकरण हे पाहायला मिळते. शेवटी फुल्यांनी डाव्या हाताने सत्यशोधक समाज धर्म हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. त्या सत्यशोधक समाजामध्ये समाजासाठी निती नियम वगैरे कोणते होते हे सिनेमा मध्ये पाहायला मिळेल. अशा वेगवेगळ्या पैलुवर या सिनेमांमध्ये प्रकाश टाकण्यात आलेला आहे. एकूणच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या लोकांना हा सिनेमा प्रेरणा देतो. म्हणून तो सगळ्यांनी पाहिला पाहिजे. नमूद केलेल्या विषयापेक्षा अन्य देखील विषय आणि घटना या सिनेमात आहेत.
———- लेख
प्रा लक्ष्मण गुंजाळ,
राज्य सदस्य सत्यशोधक ओबीसी परिषद
मो.9665815138

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here