पाचोड
पती-पत्नीमधील क्षुल्लक कारणावरून दिवाळीच्या दिवशीच पतीने पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी (१२ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी पैठण तालुक्यातील हर्षी येथे घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात सोमवारी (१३ नोव्हेंबर) खुनाचा गुन्हा दाखल झाला. प्रियंका श्रीराम वाघ (३२) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हर्षी गावात रविवारी सायंकाळी सर्व गावकरी दिवाळीमित्त लक्ष्मीपूजनात व्यग्र होते. गावातील श्रीराम निवृत्ती वाघ व पत्नी प्रियंका वाघ यांनीही घरात लक्ष्मीपूजन केले. यानंतर पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपास जाऊन पती श्रीरामने पत्नी प्रियंकाच्या कपाळावर लाकडी फळीने जोरदार आघात केला. यात पत्नी प्रियंका गंभीर जखमी झाल्याने गावातील नातेवाइकांनी त्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे यांनी प्रियंका वाघ यांना तपासून मृत घोषित केले.
यानंतर प्रभारी डीवायएसपी जयदत्त भवर यांनी घटनास्थळाची पाहणी करून याप्रकरणी तपासाच्या सूचना सपोनि संतोष माने यांना दिल्यानुसार नोंद घेतली. सोमवारी वैद्यकीय अधिकारी डॉ. नोमान शेख यांनी प्रियंकाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द केला. यानंतर प्रियंका यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मृत प्रियंकाचा भाऊ सचिन साहेबराव पवार (रा. लाडसावंगी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी आरोपी श्रीराम निवृत्ती वाघ याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याने बहिणीचा क्षुल्लक कारणामुळे खून केल्याची तक्रार दिल्यामुळे श्रीराम वाघविरुद्ध ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
उत्तरीय तपासणीसाठी विरोध
मृत प्रियंका वाघ यांना एक मुलगी व एक मुलगा असून या घटनेमुळे मुलांचे मातृछत्र हरवल्याने त्यांचा संभाळ कोण करणारं? त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासण्यासाठी विरोध दर्शवला होता. मात्र गावकऱ्यांनी मध्यस्थी करुन त्या दोन्ही मुलांच्या नावे जमीन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा वाद मिटला. त्यानंतर हर्षी येथे अंत्यसंस्कार झाले.