माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजन
गेवराई, (प्रतिनिधी)
माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त गेवराई शहरात बुधवार, दि.४ ते ११ ऑक्टोबर दरम्यान भागवताचार्य ह.भ.प.केशव महाराज उखळीकर यांची श्रीमद् भागवत कथा, पंडित अजित कडकडे यांच्यासारख्या नामांकित गायकांचा सहभाग असलेली भजन संध्या आणि नामांकित किर्तनकारांचा सहभाग असलेला भव्य किर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, दि.४ ऑक्टोबर रोजी शोभायात्रेने त्याचा प्रारंभ होणार आहे. शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या देखाव्यांसाठी आयोजकांनी स्पर्धेचे आयोजन केले असून रोख रक्कमेच्या स्वरुपात विजेत्यांना पारितोषिक दिले जाणार आहे. शोभा यात्रेसह विविध कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
गेवराई तालुक्याचे भाग्यविधाते माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त शिवछत्र प्रेमींनी बुधवार, दि.४ ते ११ ऑक्टोबर दरम्यान भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. शिवनगरी, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे दररोज दुपारी २ ते ५ यावेळेत भागवताचार्य ह.भ.प.केशव महाराज उखळीकर यांची श्रीमद् भागवत कथा होणार आहे. दररोज सायं.६ ते ८ या वेळेत भजन संध्या होणार असून रात्री ८ ते १० या वेळेत महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकारांची किर्तनसेवा होणार आहे. बुधवार, दि.४ ऑक्टोबर रोजी शोभायात्रेने किर्तन महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. सकाळी ९ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, मोंढा येथून शोभायात्रेला प्रारंभ होणार असून मेन रोड, तहसिल कार्यालय, कोल्हेर वेस, पंचायत समिती येथून शिवनगरी याठिकाणी दुपारी १२ वाजता शोभायात्रेचा समारोप होईल. शोभायात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या देखाव्यांसाठी स्पर्धा आयोजित केली असून आकर्षक देखाव्यातून प्रथम येणाऱ्यांना पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये व तृतीय दोन हजार रुपये व उत्तेजनार्थ म्हणून दोन देखाव्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दिले जाणार आहेत. आजवर १८ देखाव्यांची नोंदणी झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
अभिष्टचिंन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शोभायात्रा, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ, भजन संध्या आणि किर्तन महोत्सवात सहभागी होवून सत्संगाचा लाभ घेण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले.