गेवराई (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या साह्याने तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या सात बारा वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई- पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. या ई- पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून मागील रब्बी हंगामामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शंभर टक्के ई-पिक पाहणी करून आपल्या पिकाची नोंदणी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सध्या स्थितीत सुरू असलेल्या खरीप हंगामाची ई-पीक पाहणी देखील आपल्याला शंभर टक्के पूर्ण करायची आहे.
खरीप हंगाम 2023 पीक पाहणी नोंदणीसाठी इपिक पाहणीचे 2.0.11 हे अपडेट वर्जन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सदरचे ई-पीक पाहणी शेतकऱ्याद्वारे प्रमाणित मानण्यात येणार आहे. त्यापैकी किमान दहा टक्के तपासणी तलाठी यांच्यामार्फत करण्यात येणार असून, 48 तासात खातेदारास स्वतः पीक पाहणी दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरच्या ई-पीक पाहणी अँप द्वारे मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकासह तीन घटक पिके नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच संपूर्ण गावाची पिक पाहणी पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ईपीक पाहणी ॲप मध्ये शेतकऱ्यांकरिता मदत बटन देण्यात आलेले असून मदत कक्ष क्र.023-25712712 या दूरध्वनी क्रमांकावर देखील आपलाही ई-पीक पाहणी बाबत काही अडचणी व शंका असल्यास संपर्क करून आपल्या अडचणीचे निरसन करू शकतात.
तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन वर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पहाणी मोबाईल ॲप द्वारे पीक पाहणी करण्यासाठी एक जुलै 2023 पासून सुरू करण्यात आलेले आहे. बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनी, गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कोतवाल स्वस्त धान्य दुकानदार, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष बचत गट प्रतिनिधी, सहकारी संस्थांचे अध्यक्ष व सचिव अध्यक्ष शेतकरी दूध उत्पादक संघ, पाणी फाउंडेशन गट, पोखरा प्रतिनिधी, ग्रामरोग रोजगार सेवक प्रतिनिधी, सहाय्यक बँक प्रतिनिधी, शाळा व कॉलेज विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी, सर्व ग्रामपंचायत समिती पंचायत समिती व जिल्हा परिषद चे सदस्य, मीडिया प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी देखील शासनाच्या महत्त्वकांक्षी असलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पात सहभाग घेऊन शेतकऱ्याची पीक पाहणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आव्हान गेवराई तहसीलचे तहसीलदार संदीप खोमणे यांनी केले आहे.
खरीप हंगाम 2023 ची ई-पीक पाहणी करण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना आव्हान करण्यात येते की, त्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणेकरून शासनाच्या विविध योजना पिक विमा पीक कर्ज, शासकीय अनुदान इत्यादी विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.
बीड जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामाची ई-पीक पाहणी शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी विविध घटकांनी तसेच सर्व शेतकऱ्यांनी शंभर टक्के भाग घेऊन ई-पीक पाहणी पूर्ण करावी असे आव्हान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या आदेशाने तहसीलदार संदीप खोमणे यांनी केले आहे.
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/09/FB_IMG_1695982949661-1-1024x1024.jpg)