पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशीरा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. त्यानंतर राऊत यांना ‘ईडी’च्या कार्यालयात नेण्यात आले. तिथे रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर रात्री उशीरा राऊत यांना ईडीने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. या अटकेमुळे सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष हा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.
“संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. भाजपा त्यांना घाबरत असल्याने त्यांना अटक करण्यात आलीय. त्यांनी आम्हाला यासंदर्भातील (अटकेसंदर्भातील) कागदपत्रं दिलेली नाहीत. त्यांना यात गोवण्यात आलेलं आहे,” असा आरोप सुनिल यांनी केला. आज सकाळी साडेअकरा वाजता त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाणार असल्याची माहितीही सुनिल राऊत यांनी दिल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलंय.