बीड, (प्रतिनिधी) ः- संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीने पात्र केलेल्या १२ हजार लाभार्थ्यांना मंजुरी आदेश देवून नियमित अनुदान सुरु करावे, कृषी आणि महसुल विभागाच्या अधिकार्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रलंबित राहिलेल्या पी.एम.किसान योजनेतील ३ हजार पात्र लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान सुरु करण्यासह ग्रामपंचायत विभक्तीकरण, प्रलंबित मावेजा प्रकरणे यांसह विविध विषयासंदर्भात आ.विजयसिंह पंडित यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या प्रश्नाच्या अनुषंगाने संबंधित अधिकार्यांना सूचना देवून पात्र लाभार्थ्यांना आठवडाभरात अनुदान मिळेल असे आश्वासन दिले. विविध विषयात येणार्या अडचणीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर मार्ग काढण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. बैठकीला जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
गेवराई विधानसभा मतदार संघातील विविध विषयांच्या अनुषंगाने आ.विजयसिंह पंडित यांनी जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीने गेवराई तालुक्यातील सुमारे १२ हजार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजुर केले आहेत. मात्र तहसिल कार्यालयातील दफ्तर दिरंगाईमुळे पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेशाचे वाटप न केल्यामुळे मागील चार महिण्यांपासुन निराधार लाभार्थी अनुदानापासुन वंचित होते. कृषी आणि महसुल अधिकार्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे शुल्लक त्रुटी काढुन तालुक्यातील तीन हजार लाभार्थी पी.एम. किसान योजनेच्या रास्त लाभापासुन वंचित आहेत. या दोन्ही प्रश्नांबाबत आ. विजयसिंह पंडित यांनी बैठकीत विचारणा केली. त्याच बरोबर या बैठकीत ग्रामपंचायत विभक्तीकरण करुन बंजारा तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देणे, प्रलंबित भुसंपादनाची प्रकरणे, श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील तिर्थक्षेत्र विकास आराखडा यासह विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होवुन अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना (पी.एम. किसान) मधील अपात्र झालेल्या सुमारे तीन हजार लाभार्थी शेतकर्यांना आवश्यक असलेले महसुली पुरावे उपलब्ध करुन देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी तहसिलदारांना दिल्या. कृषी विभागाचे उपसंचालक आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा तात्काळ करुन कृषी आयुक्त कार्यालयाला सादर करणार आहेत. सुमारे २१०० लाभार्थ्यांना पुढील आढवडेभरात अनुदान सुरु करणार असल्याचे या बैठकीत नियोजन करण्यात आले. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेश देण्यासाठी लागणार्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या उपलब्ध करुन देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. त्यामुळे पुढील पाच दिवसात योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेशाचे वाटप करुन अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे तहसिलदार खोमणे यांनी सांगितले. त्यामुळे गेवराई तालुक्यातील गोर-गरीब लाभार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आ. विजयसिंह पंडित यांना यश आले आहे.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) शैलेश सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर मोकाटे, तहसिलदार संदिप खोमणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, कृषी उपसंचालक जाधवर, तंत्र अधिकारी खेडकर, तालुका कृषी अधिकारी अभयकुमार वडकुते यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.