बीड- पैठण येथील जायकवाडी धरण 97 टक्के भरल्याने उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातील 32 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जायकवाडीमधून सोडण्यात आलेले पाणी आता बीड जिल्ह्यात पोहचले असून गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन मंदिराला पाण्याने वेढले आहे.
बीड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सध्या तरी पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही. मात्र अचानक पाऊस झाला तर पूरपरिस्थिती येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील तब्बल 32 गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आलाय. गोदा काठ परिसरात शेतकऱ्यांना जाण्यास देखील प्रशासनाकडून मज्जाव करण्यात आला. सध्या गोदावरी दुथडी भरून वाहत आहे.
माजलगाव धरण, २६ गावांना सतर्कतेचा इशारा
जायकवाडी धरण ९० टक्के भरल्याने १८ दरवाजे वर उचलून गोदावरी पात्रात २८ हजार क्युसेक तर माजलगाव धरणात ५५० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गोदावरी पात्रात केव्हाही पाण्यात वाढ होऊ शकते. वाढणाऱ्या पाणी पातळीमुळे गोदावरीपात्रा शेजारीलं गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने गोदापात्रा शेजारील २६ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नाथसागर धरणाच्यावरील भागात जास्त पाऊस झाल्याने धरणात पाणीसाठी ९० टक्क्यांवर झाला. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने जायकवाडीतून गोदावरी नदी पात्रात व माजलगाव धरणात पाणी सोडले आहे. माजलगाव धरणात तीन दिवसापासून तर गोदावरी पात्रात दोन दिवसापासून पाण्याची आवाक सुरू आहे. माजलगाव धरणात मंगळवार रोजी ५५० क्युसेक तर गोदावरी नदीपात्रात २८ हजार २९६ क्युसेक अशी आवक सुरु आहे.
आवक लवकरच गोदापात्र आणि धरणात येईल. तसेच पुढील काही दिवसात जास्त पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आताची आवक आणि नंतर पावसामुळे होणाऱ्या पाणीपातळीतील वाढ यामुळे माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात शेजारील गावातील नागरिकांमध्ये आत्तापासूनच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या माजलगाव धरणात ४१ टक्के पाणीसाठा असून एक दोन मोठ्या पावसात हे धरण केंव्हाही भरू शकते. त्यामुळे दोन्ही धरणातून पाणी सोडण्याची वेळ आल्यास अनेक गावांना धोका निर्माण होऊ शकतो.
या गावांना धोक्याचा इशारानाथसागर व माजलगाव धरण भरल्यास माजलगाव तालुक्यातील मोगरा, गंगामसला, आबेगाव, छत्रबोरगाव, सादोळा, मंजरथ, सरवर पिंपळगाव, सोमठाणा, पुरूषोत्तमपुरी, शेलगावथडी, काळेगावथडी, डुब्बाथडी, महातपुरी, कवडगावथडी, गव्हानथडी, रिधोरी, हिवरा , जायकोवाडी, आळसेवाडी, आडोळा, सुरूमगाव, गुंजथडी, सोन्नाथडी, शुक्लतिर्थलिमगाव, पिंप्रीखुर्द, खतगव्हाण या गावांसह माजलगाव शहरातील आंबेडकर नगर भागास धोका निर्माण होऊ शकतो.