मुंबई
: मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका सेवानिवृत्त जोडप्याला तब्बल 18 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना विलेपार्ले परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेन्री पॉल आणि भावना टी अशी फसवणूक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपी पैसे घेऊन गेली पाच वर्षे फिर्यादींना केवळ आश्वासन देत होते. विलेपार्ले पोलिसांनी कलम 34 (गुन्ह्याचा सामान्य हेतू), 406 (विश्वासाचा भंग) आणि 420 (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.मित्राच्या माध्यमातून आरोपींशी ओळख विलेपार्ले येथे राहणारे श्रीपत रेवगडे आणि त्यांची पत्नी टपाल सेवेतून निवृत्त झाले आहेत. रेवगडे यांचा मुलगा नितिनने 2015 मध्ये यूएसएच्या मायामी फ्लाइंग अकादमीमध्ये पायलटचा कोर्स पूर्ण केला होता. मात्र त्याला नोकरी नव्हती. नितिन नोकरीच्या शोधात असतानाच रेवगडे यांची एका मित्राच्या माध्यमातून हेन्री पॉल याच्यासोबत ओळख झाली. हेन्रीने आपण अपोलो गुप्तचर सुरक्षा कंपनी चालवत असून, विविध विमान कंपन्यांमध्ये संपर्क असल्याचे रेवगडे यांना सांगितले.
जेव्हा रेवगडे आणि त्यांचा मित्र हेन्रीला भेटले तेव्हा त्याने आपली जोडीदार भावना हिच्याशी ओळख करुन दिली. रेवगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेन्रीने आपली जेट एअरवेजमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्याशी ओळख असल्याचा दावा केला होता, जो टाइप रेटिंग कोर्स चालवण्यास मदत करू शकतो. तसेच अकादमीतून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर अधिकारी त्याला एका नामांकित कंपनीत नोकरी देईल, असेही त्याने सांगितले.