गेवराई प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त महाविद्यालयीन युवतींना हिंसाचाराच्या विरुद्ध मनोबल उंचावण्यासाठी स्वसंरक्षण जागृती कार्यक्रमाचे आयोजन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र. भ. अट्टल महविद्यालयात नुकताच संपन्न झाला.
महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. रजनी शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रो. मीना नागवंशी यांनी महाविद्यालयीन युवतींना मार्गदर्शन करताना सांगितले की “सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीपासून ते भयावह अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर भीतीच्या छायेत वावरणाऱ्या युवतींनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ आली आहे. छेडछाडीच्या घटनांमध्ये महिलांना विरोध करण्याचे तंत्र माहीत नसल्याने त्यांना अश्या प्रसंगाचा सामना करावा लागतो. यामुळे महिलांचे मानसिक स्वास्थ्य ढासळते, आत्मविश्वास कमी होतो. अशावेळी खचून जाता कामा नये. अशा घटनांचा आणि प्रवृत्तींचा सामना केला पाहिजे”. महिला अत्याचार विरोधी कायद्याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वृषाली गव्हाणे यांनी केले, तर डॉ. सुदर्शना बढे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मधुप्रिया सुर्यवंशी, प्रा. पुष्पा नरवडे, प्रा. प्रियांका चव्हाण, प्रा. कविता वाघ यांनी परिश्रम घेतले.