रूट कॅनल उपचारांबाबत गैरसमजामुळे अनेक लोक हे उपचार करणे टाळतात. यामुळे रूट कॅनल विषयी ही माहिती जरूर वाचा.रूट कॅनल ही दातांच्या उपचारांसाठी करण्यात येणारी एक उत्तम पद्धत आहे.मात्र अनेक लोक दात खराब झाले असल्यास देखील हे उपचार करून घेणे टाळतात. दातांच्या समस्येचा नकळत तुमचे आरोग्य व दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो.या उपचारांबाबत तुम्हाला सर्व माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.मला अनेक जणांनी रूट कॅनल याविषयी विचारलेल्या,या निवडक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देत आहे. 01..रूट कॅनल उपचार खूप वेदनादायक असतात का? उत्तर….आज-काल करण्यात येणाऱ्या आधुनिक पद्धतीनुसार भूल दिल्यामुळे रूट कॅनल उपचार करताना वेदना जाणवत नाही. 02… रूट कॅनल ऐवजी दात मुळापासून काढून टकणे योग्य असू शकते का? उत्तर… मुळीच नाही.आपल्या शरीरात दातांचे महत्त्व अनमोल आहे.कृत्रिम दातासोबत नैसर्गिक दातांची तुलना होऊ शकत नाही.एक दात काढून टाकल्याने समस्या कमी होत नाही,तर अधिक वाढते. कारण त्यामुळे त्याच्या आजूबाजूचे दात खिळखिळीत होतात.हिरड्यांच्या समस्या निर्माण होतात व अन्न चावणे कठीण होते.03.. रूट कॅनॉल उपचारांसाठी खूप वेळ का लागतो? उत्तर… रूट कॅनल उपचार करताना तुमचा दात किडका असल्यास प्रथम अँटिबायोटिक्स आणि वेदनाशामक अर्थात पेन किलर देऊन त्यामधील सूज व वेदना कमी करण्यात येते.त्यानंतर तीन ते चार दिवसांनी डेंटिस्ट त्यांच्या साधनांच्या साह्याने दातांची मुळे स्वच्छ करतात.दात मुळापासून स्वच्छ केल्यानंतर मुळामध्ये पुन्हा इन्फेक्शन होऊ नये यासाठी कृत्रिम नस भरण्यात येते. व त्यानंतर दातासारखी कॅप त्या भागावर बसविण्यात येते.त्यामुळे या उपचारांसाठी वेळ लागतो. 04.. रूट कॅनल नंतर दातावर कॅप बसविण्याची काय गरज आहे? उत्तर… रूट कॅनल उपचारांमध्ये दातावर असणारा डेंटल पल्प हा भाग काढून टाकण्यात येतो. ज्या भागामुळे दाताचे पोषण होत असते. उपचारानंतर अन्नपदार्थ चावताना त्या भागावर येणारा दाब सहन करता यावा, यासाठी त्यावर कॅप बसविण्यात येते.हा दाब सहन करण्यासाठी व दातांचे कार्य सुरळीत होण्यासाठी डेंटिस्ट तुम्हाला मेटल सिरॅमिक अथवा इतर पदार्थांची कॅप बसविण्याचा सल्ला देतात.आपल्या शरीराचे प्रत्येक अवयव अतिशय महत्त्वाचे असतात. उदा.डोळे,कान,दात यांचे आपल्याला महत्व वाटत नाही.म्हणून त्याची फारशी काळजी घेत नाही.परंतु निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.कोणाला वाटत नाही बरं,आपले दात मोत्या सारखे सुंदर असावेत ? आपल्या दातांची काळजी आपणच घ्यायला हवी !
लेख संकलन.
.डॉ.सय्यद हुमायुद्दीन,आष्टी